Sheikh Hasina : बांगलादेशात अराजक निर्माण झालं आहे. हिंसक निदर्शनं झाल्यानंतर पंतप्रधान निवासाचा आंदोलकांनी ताबा घेतला. या प्रचंड अस्थिर वातावरणात शेख हसीना ( Sheikh Hasina ) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला. त्या भारतात आल्या, भारतात त्या गाझियाबादमध्ये आल्या आणि अजित डोवाल यांच्याशी त्यांनी चर्चा केल्याचं वृत्त आहे. याबाबत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. शेख हसीना ( Sheikh Hasina ) भारतात आहेत का ? हा प्रश्न राहुल गांधींनी विचारल्यावर परराष्ट्र मंत्र्यांनी त्यावर उत्तर दिलं आहे.

बांगलादेशातल्या हिंसाचारात १०० हून जास्त लोकांचा बळी

बांगलादेशमध्ये चालू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. आंदोलकांनी शेख हसीना ( Sheikh Hasina ) यांचं कार्यालयही जाळलं आहे. शेख हसीना ( Sheikh Hasina ) यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशच्या लष्करांने प्रशासनावर तात्पुरता ताबा घेतला आहे. आरक्षणाच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचं रूपांतर हिंसाचारात झालं. यानंतर सध्या बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बांगलादेशमधील इंटरनेट सेवा देखील अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.

हे पण वाचा- Taslima Nasreen : शेख हसीनांवर तस्लिमा नसरीन यांची टीका, “ज्यांना खुश करण्यासाठी मला देश सोडायला लावला…”

राहुल गांधींचा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी संवाद

पंतप्रधानांच्या निवासस्थानी CCS ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, त्यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींना बांगलादेशातील परिस्थितीची माहिती दिली. दुसरीकडे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही यासंदर्भात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना प्रश्न विचारल्याचं समोर आलं आहे. एस. जयशंकर म्हणाले की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, काही कळताच, त्यासंदर्भात माहिती कळवेन.

माध्यमातील माहितीनुसार शेख हसीना यांनी दि. ५ ऑगस्ट दुपारी बांगलादेशमधून दुपारी २.३० वाजता प्रस्थान केले. त्यांच्याबरोबर त्यांची लहान बहीण शेख रेहानाही होत्या.

राहुल गांधींना परराष्ट्र मंत्र्यांचं उत्तर काय?

समोर आलेल्या माहितीनुसार सोमवारी लोकसभेचं कामकाज दुसऱ्या दिवसापर्यंत तहकूब करण्यात आलं, तेव्हा राहुल गांधी आपल्या जागेवरून उठले आणि सभागृहात एस. जयशंकर यांच्याकडे गेले. त्यांनी परराष्ट्रमंत्र्यांना विचारलं की, बांगलादेशात काय चाललं आहे? सरकारची भूमिका काय? शेख हसीना ( Sheikh Hasina ) भारतात आल्या आहेत का? याशिवाय आणखी काही असे प्रश्नही त्यांनी विचारले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे प्रश्न ऐकून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, जशी काही माहिती मिळेल, मी तुम्हाला नक्की सांगेन. बांगलादेशात गोंधळाचं आणि हिंसेचं वातावरण आहे. बांगलादेशात काय काय घडतं आहे त्याकडे भारत लक्ष ठेवून आहे असं उत्तर तूर्तास राहुल गांधींना मिळाल्याचं समजतं आहे.