अलीकडेच सीमांकन आयोगानं जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याबाबतचा अहवाल जारी केला आहे. हा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केल्यानंतर लवकरच जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीचे वारे वाहत असताना काँग्रेसच्या माजी आमदारानं खळबळजनक विधान केलं आहे. पुढील निवडणुकीत काँग्रेस पक्ष जम्मू काश्मीरमध्ये एकही जागा जिंकू शकणार नाही. त्यांनी एकही जागा जिंकली, तर मला लाल चौकात नेवून गोळ्या घाला, असं वक्तव्य संबंधित माजी आमदारानं केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद अमीन भट असं काँग्रेसच्या माजी आमदाराचं नाव आहे. ते देवसर मतदार संघातून दोनदा निवडून आले होते. ते आपल्या वक्तव्यात म्हणाले की, ‘जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने एकही जागा जिंकली तर मला लाल चौकात नेवून गोळ्या घाला. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार भट हे गुलाम नबी आझाद यांचे अत्यंत विश्वासू मित्र मानले जातात. आझाद यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

“गुलाम नबी आझाद यांच्याशिवाय काँग्रेस पक्षाला जम्मू काश्मीरमध्ये कवडी किंमत आहे. तुम्ही आझाद यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केलं, तर काश्मीर खोऱ्यात काँग्रेसचं सरकार नक्की स्थापन होऊ शकतं, असंही ते म्हणाले. सध्या जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची स्थिती अत्यंत वाईट आहे. गुलाम नबी आझाद यांच्यामुळेच मी काँग्रेसी होऊ शकलो. मी दोनदा आमदार झालो, युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो. पण आता मी जास्तीत जास्त ५०० सदस्य गोळा करू शकतो, असंही ते म्हणाले.

गुलाम नबी आझाद यांनी नोव्हेंबर २००५ ते जुलै २००८ दरम्यान जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. आझाद हे काश्मीर खोऱ्यातील काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं तर जम्मू काश्मीरमध्ये आजही काँग्रेसची सत्ता येऊ शकते, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoot me at lal chowk if congress own single seat in assembly elections in jammu and kashmir made statement by former congress mla rmm