शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भाजपा, पंतप्रधान मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांवर उद्धव ठाकर यांनी जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर भाजपाने देखील आक्रमक भूमिका घेतली व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच प्रमुख भाजपा नेत्यांकडून शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकासआघाडीवर जोरादार टीका सुरू झाली. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना उद्देशून एक खळबळजनक विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मला माहिती नाही म्हणजे महाराष्ट्रात किंवा देशात गांजाचं पीक जास्त निर्माण झालंय आणि काही लोक गांजा मारून काम करतात, हे दिसतय.. दसरा मेळव्यानंतर मला वारंवार दिसतय की, ज्या प्रकारे विरोधी पक्ष बेतालपणे बोलतोय. या सर्वांची आता नार्कोटेस्ट केली पाहिजे. एनसीबीने असं बेताल बडबडणाऱ्यांची टेस्ट केली पाहिजे, की ते काय मारतात का? त्यांना कुणी पुरवतं का? हे फार गरजेचं आहे. मला इथे(सिल्वासा) पण तेच दिसतय. इतक्या बेधुंदपणे कुणी कारभार करू शकत नाही. ” असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत टीव्ही-9 शी बोलताना म्हणाले आहेत.

पोटनिवडणुकीसाठी संजय राऊत सिल्वासामध्ये दाखल –

दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत मरीन ड्राईव्ह इथल्या एका हॉटेलमध्ये २२ फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. त्यामुळे दादरा नगर हवेलीच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुक होत असून ३० ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच, या पोटनिवडणुकीसाठी कलाबेन या शिवसेनेच्या उमेदवार असतील असं शिवसेनकडून घोषितही करण्यात आलं होतं व त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली आहे. आता त्यांच्या प्रचारासाठी संजय राऊत सध्या सिल्वासामध्ये दाखल झालेले आहेत.

जसं महाराष्ट्राचे राज्यपाल ठरवतात, तुम्ही आमच्या पक्षाचे नाहीत ना मग … –

यावेळी संजय राऊत यांनी सांगितले की, “मोहन डेलकरांनी आत्महत्या केली तेव्हा त्यांनीच उल्लेख केलेला आहे की, ज्या प्रकारे या संपूर्ण दादरा-नगर हवेली , सिल्वासा भागातील प्रशासन ज्या दहशतीच्या मार्गाने चालवलंय. मुळात दादरा-नगर हवेलीचा जो प्रशासक असतो, हा आयएएस अधिकारी असतो. एक अधिकारी असतो. हा केंद्रशासीत प्रदेश आहे. पण भाजपाच राज्य आल्यामुळे त्यांनी इथे एक राजकीय माणसाची सोय लावली. प्रफुल खेडापटेल हे गुजरात मंत्रिमंडळात मंत्री होते. ते निवडणूक हरले. मोदींच्या लाटेत निवडणूक हरले आणि त्याला प्रशासक म्हणून नेमलं. ज्याला लोकांनी नाकारलं आहे गुजरातमध्ये त्याला इथे प्रशासक नेमले हे घटनाबाह्य आहे. कारण, ही आयएएस अधिकाऱ्याची जागा आहे. आयएएस अधिकाऱ्याला इथे नेमावं लागतं. पण मनमानी आणि मस्तवालपणा इथेही दिसतो. त्यातून इथे सगळं घडतय. इथे आर्थिक व्यवहार आहेत. हजारो कोटींची उलाढाल, टेंडरबाजी चालते. केंद्रशासीत प्रदेशात विचारायला कुणी नसतं. थेट गृहमंत्रालयाशी संबंध असतो, इथे कुणी विचारायची हिंमत नाही. त्याला अमर्याद अधिकार आहे. ते तुरुंगात टाकतात लोकांना. प्रश्न विचारणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जातं. काल इथे मराठा समजाचा बैठक होती. अनेक लोक आली होती, इकडे मराठी समाज मोठ्याप्रमाणावर आहे. त्यांनी मला सांगितलं की इथे जर आम्ही मोहन डेलकरांबरोबर काम करतोय असं त्यांना दिसलं, तर ते आमच्या उद्योगधंद्यांवरती बालंट आणतात. आमच्या आर्थिक नाड्या आवळतात. आमची कामं बंद करतात. आमची दुकानं बंद करतात, आमची कंत्राटं रद्द करतात. ही कुठली लोकशाही? मी नागरिक आहे मला अधिकार आहे, कोणत्या राजकीय पक्षाचं काम करावं. मी कोणती राजकीय विचारश्रेणी स्वीकारावी हा मला अधिकार दिलेला आहे. पण या दादरा-नगर हवेली, सिल्वासामध्ये प्रशासक ठरवतो कोणी कोणत्या पक्षाचं काम करायचं. जसं महाराष्ट्राचे राज्यपाल ठरवतात, तुम्ही आमच्या पक्षाचे नाहीत ना मग मी तुमच्या फाईलवर सही नाही करणार. ही एक नवीनच प्रथा, पायंडा सुरू झालेला आहे.”

मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर शिवसेनेत, दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार

ही लोकशाही या देशात मी प्रथमच पाहतो आहे –

याचबरोबर, “या देशातील लोकाशाहीचे घटनात्मक संकेत हे पाळून तुम्ही तुमचा पक्ष वाढवा. तुमचं राज्य करा. माणसांचे स्वभाव असू शकतात. कुणी खंबीर, सौम्य, कठोर असतो. कुणी बोलघेवडा असतो तर कुणी गोडबोल्या असतो. पण अशा पद्धतीने तुम्ही माणसाचं राजकीय अस्तित्व उध्वस्त करण्यासाठी त्यांना आत्महत्येच्या दारापर्यंत नेऊन ठेवतात. ही लोकशाही या देशात मी प्रथमच पाहतो आहे .” असं देखील संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some people seem to work with marijuana ncb should now narco test those who talk nonsense msr