काही महिन्यांपूर्वी दोन भारतीय औषधांवर जागतिक आरोग्य संघटनेकडून आक्षेप घेण्यात आला होता. उझबेकिस्तानमध्ये हे भारतीय कफ सिरप प्यायल्यामुळे काही मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आणखीन एका भारतीय कफ सिरपबाबत WHO आक्षेप घेतला आहे. गेल्या सात महिन्यांत अशा प्रकारे WHO कडून आक्षेप घेतलं जाणारं हे तिसरं भारतात उत्पादित होणारं कफ सिरप ठरलं आहे. मार्शल आयलँड्स आणि मायक्रोनेशिया या ठिकाणी हे सिरप विकलं जात होतं. दरम्यान, WHO च्या अलर्टनंतर कफ सिरप उत्पादक कंपनीकडून त्यांच्या नावाने बनवट औषध तयार केलं जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नेमकं कोणतं आहे हे औषध?
हे एक कफ सिरप असून त्याचं मूळ इंग्रजी नाव ग्वाईफेनेसिन (Guaifenesin) असं आहे. या कफ सिरपमध्ये मान्य मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात जायथिलिन ग्लायकोल आणि इथिलेन ग्लायकोल हे घटक असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या दर्जा तपासणी विभागानं केलेल्या तपासणीत आढळून आलं होतं. उझबेकिस्तानमध्ये १८ आणि गॅम्बियामध्ये ७० मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सिरपमध्येही हेच घटक जास्त प्रमाणात आढळून आल्याचं समोर आलं आहे.
WHO चं नागरिकांना आवाहन
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं हे औषध न वापरण्याचं आवाहन लोकांना केलं आहे. तसेच, औषध नियंत्रण विभागांना यासंदर्भात काळजी घेण्याचेही निर्देश WHO नं दिले आहेत. याशिवाय, या औषधाच्या उत्पादक कंपनीलाही कच्च्या मालाची अधिक काळजीपूर्वक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भारतात कुठे होतं उत्पादन?
या औषधाचं उत्पादन पंजाबमध्ये होत असल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात दिली आहे. पंजाबमधील क्यूपी फार्माचेम लिमिटेड कंपनीकडून हे औषध तयार केलं जात असून हरियाणातील थ्रिलियम फार्माकडून या औषधाचं मार्केटिंग केलं जातं. आजपर्यंत उत्पादक कंपनी किंवा मार्केटिंग कंपनीकडून या औषधासंदर्भात सुरक्षा किंवा दर्जासंदर्भात कोणतीही गॅरंटी देण्यात आली नसल्याचंही WHO कडून स्पष्ट करण्यात आलं आहे.