मंगल हनवते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई ते पुणे दरम्यान द्रुतगती महामार्गावर लोणावळा, खंडाळादरम्यान अनेक छोटे-मोठे बोगदे लागतात. येत्या काळात, लवकरच या मार्गावर डोंगराखालील, तलावाच्या तळाखालून जाणाऱ्या बोगद्याची भर पडणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नवी खोपोली ते कुसगाव मार्गिकेतील (मिसिंग लेन प्रकल्प) प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. या बोगद्याचे, पर्यायाने नवीन मार्गिकेचे कामही वेगाने सुरू आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा हा बोगदा आशियातील सर्वांत रुंद बोगदा असणार आहे. या वैशिष्ट्यपूर्ण बोगद्यातून कधी प्रवास करता येईल, हा बोगदा नेमका कसा आहे, मिसिंग लेन प्रकल्प काय आहे, त्याचा फायदा काय होईल हे जाणून घेऊया…

मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्ग आहे कसा?

राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी, प्रवास वेगवान करण्यासाठी नवीन पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय १९९०मध्ये घेण्यात आला. ब्रिटिशकालीन जुना मुंबई ते पुणे महामार्ग भविष्यात अपुरा पडणार असल्याने नवीन महामार्ग बांधण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून हाती घेण्यात आले. महामार्गाचे प्रत्यक्ष काम १९९८मध्ये सुरू झाले. हा ९४.५ किमीचा महामार्ग २००२मध्ये पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. या महामार्गामुळे मुंबई ते पुणे अंतर तीन ते साडेतीन तासांत कापता येऊ लागले. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी टोल भरावा लागतो. मात्र हा राज्यातील वाहतुकीच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा महामार्ग मानला जात असून देशातील सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग अशी ही त्याची ओळख आहे. या महामार्गाला २००९ मध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले आहे.

द्रुतगती मार्ग सुधारणा प्रकल्पाची गरज का?

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ कमी झाला. मात्र मागील काही वर्षांत महामार्गावरील वाहनांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. येत्या काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्गावरील अपघातातही वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गावरील प्रवास आणखी वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी एमएसआरडीसीने खोपोली ते कुसगाव अशी १९.८० किमीची नवीन मार्गिका (मिसिंग लेन) बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सध्या वेगात सुरू आहे. त्याचवेळी महामार्ग आठपदरी करण्यात येणार आहे. या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. दरम्यान खोपोली ते कुसगाव मार्गिकेमुळे मुंबई ते पुणे प्रवासातील अंतर २० ते २५ मिनिटांनी कमी होणार आहे. तसेच प्रवासही अधिक सुरक्षित होणार आहे. या मार्गिकेत दोन बोगदे बांधण्यात येत असून त्यातील एक बोगदा चक्क डोंगराखालून, तलावाखालून गेला आहे. हा बोगदा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर हा आशियातील सर्वांत रुंद बोगदा असेल.

विश्लेषण : धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर अदानी समुहाकडे; प्रदीर्घकाळ प्रलंबित राहण्यामागचं नेमकं कारण काय?

नेमका कसा आहे आशियातील सर्वांत रुंद बोगदा?

एमएमआरडीसीने १९.८० किमीच्या नव्या मार्गिकेच्या कामाला फेब्रुवारी २०१९मध्ये सुरुवात केली असून अशा या मार्गिकेत दोन बोगद्यांचा समावेश आहे. त्यातील एक बोगदा १.७५ किमीचा तर दुसरा ८.९२ किमीचा आहे. त्यातील ८.९२ किमीचा बोगदा हा आशियातील सर्वांत रुंद असा डोंगराखालून आणि तलावाखालून जाणारा बोगदा ठरणार आहे. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावर हा बोगदा आहे. बोगद्याची रुंदी २३.७५ मीटर आहे. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बोगद्याचे काम करण्यात येत आहे. प्रवासी, वाहने यांच्या सुरक्षेचा बारीक विचार करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर मार्ग तयार करण्यात आले आहेत. बोगद्याच्या भिंतीला ५ मीटरचे आवरण करण्यात येणार असून त्यावर आगप्रतिबंधक लेपन करण्यात येणार आहे. आग लागल्यास ती विझवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असेल. हा बोगदा, नवी मार्गिका अनेक कारणाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणारा आहे.

या बोगद्यातून प्रवास कधीपासून?

या प्रकल्पाच्या कामाला फेब्रुवारी २०१९मध्ये सुरुवात झाली. हे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणी आणि करोनाच्या संकटामुळे प्रकल्पास विलंब झाला आहे. आता मात्र हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार एमएसआरडीसीने कामाचा वेग वाढवला आहे. एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत प्रकल्पाचे एकूण ५७ टक्के काम पूर्ण झाले आहे. १९.८० किमीच्या मार्गिकेतील पुलाचे ४३ टक्के तर दोन्ही बोगद्यांचे ६३ टक्के काम पूर्ण झाले आहे. वर्षभरात उर्वरित काम पूर्ण करून ही मार्गिका डिसेंबर २०२३मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. म्हणजेच डोंगर-तलावा खालून जाणाऱ्या आशियातील सर्वात रुंद बोगद्यातून डिसेंबर २०२३ मध्ये प्रवास करता येऊ शकेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai pune express way tunnel under high hill river print exp pmw
First published on: 01-12-2022 at 08:12 IST