विश्लेषण : इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीमुळे कसोटी क्रिकेटला संजीवनी मिळू शकते का? ही शैली नेमकी काय आहे? | What is Bazball style of England cricket team in test know all about | Loksatta

विश्लेषण : इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीमुळे कसोटी क्रिकेटला संजीवनी मिळू शकते का? ही शैली नेमकी काय आहे?

इंग्लंडच्या या नव्या, आक्रमक, गतिमान शैलीला ‘बॅझबॉल’ असे का संबोधले जात आहे आणि चाहत्यांना कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा रस निर्माण करण्यात ही शैली कितपत यशस्वी होत आहे, याचा आढावा.

विश्लेषण : इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ शैलीमुळे कसोटी क्रिकेटला संजीवनी मिळू शकते का? ही शैली नेमकी काय आहे?
इंग्लंड क्रिकेट टीम (संग्रहित छायाचित्र)

– अन्वय सावंत

कसोटी हा क्रिकेटचा सर्वांत पारंपरिक प्रकार. मात्र, अलीकडच्या काळात एकदिवसीय आणि विशेषत: ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे कसोटी क्रिकेट मागे पडत चालल्याची भावना निर्माण झाली होती. पाच दिवस चालणाऱ्या कसोटी सामन्यापेक्षा तीन-चार तासांत संपणारा ट्वेन्टी-२० सामना पाहण्याकडे लोकांचा कल होता. अजूनही आहे. मात्र, इंग्लंडच्या संघाने कसोटीमध्येही ट्वेन्टी-२० क्रिकेटचा अनुभव देण्यास सुरुवात केली आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅककलमची प्रशिक्षकपदी निवड झाल्यापासून इंग्लंडच्या कसोटी संघाचा आणि त्यांच्या खेळण्याच्या शैलीचा कायापालट झाला आहे. इंग्लंडच्या या नव्या, आक्रमक, गतिमान शैलीला ‘बॅझबॉल’ असे का संबोधले जात आहे आणि चाहत्यांना कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा रस निर्माण करण्यात ही शैली कितपत यशस्वी होत आहे, याचा आढावा.

‘बॅझबॉल’ काय आहे?

इंग्लंडच्या संघाला २०१५च्या एकदिवसीय विश्वचषकात साखळी फेरीचाही टप्पा पार करता आला नव्हता. त्यानंतर इयॉन माॅर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक शैलीत खेळण्यास सुरुवात केली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला आणि इंग्लंडने २०१९ साली मायदेशात झालेला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. मात्र, त्याच वेळी कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा आलेख उतरता होता. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲशेस मालिकेत इंग्लंडला ०-४ अशी हार पत्करावी लागली. त्यानंतर ख्रिस सिल्व्हरवूड यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली, तर त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यामुळे रूटने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.

मग अष्टपैलू बेन स्टोक्सची इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आणि मॅककलमने प्रशिक्षकपद सांभाळले. खेळाडू म्हणून कारकीर्दीत मॅककलम आक्रमक फलंदाज आणि तितकाच आक्रमक कर्णधार मानला जायचा. त्याच्या मार्गदर्शनात इंग्लंडचा कसोटी संघ आक्रमक शैलीत खेळणार याचे संकेत आधीच मिळाले होते आणि तसेच झाले. मॅककलमला ‘बॅझ’ या टोपणनावाने संबोधले जाते. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक पवित्रा स्वीकारल्यानंतर त्यांच्या या शैलीला ‘बॅझबॉल’ अशा नावाने संबोधले जाऊ लागले.

‘बॅझबॉल’ क्रिकेटचे वैशिष्ट्य काय?

कसोटी क्रिकेटमध्ये संयमाला फार महत्त्व आहे. संयमासह बचावात्मक खेळाचे तंत्र आणि मानसिक सक्षमता या आघाड्यांवर बाजी मारणारा संघ कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होतो, असे मानले जाते. खेळपट्टीवर अधिकाधिक वेळ टिकून राहणे, कमीत कमी धोका पत्करून जास्तीत जास्त धावा करणे हे फलंदाजांचे लक्ष्य असते. मात्र, मॅककलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडच्या कसोटी संघाने हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. सावध फलंदाजी करून खेळपट्टीवर टिकण्यापेक्षा आक्रमक शैलीत, फटकेबाज खेळ करून प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवर दडपण आणण्याची मॅककलमने इंग्लंडच्या फलंदाजांना सूचना केली आहे. ‘तुम्ही कितीही सावध फलंदाजी केली, तरी एखादा चांगला चेंडू पडल्यास तुम्ही बाद होणारच. त्यामुळे बाद होण्याचा विचार करण्यापेक्षा धावांवर लक्ष केंद्रित करा,’ असा मॅककलमचा संदेश आहे. त्याने आपल्या खेळाडूंना चुका करण्याची मोकळीक दिली आहे. खेळाडूंच्या मनातून अपयशाची भीती काढून टाकली. त्यामुळे इंग्लंडचे खेळाडू निडरपणे खेळताना दिसत आहेत.

मॅककलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड कितपत यशस्वी?

मॅककलमचे मार्गदर्शन आणि स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या कसोटी संघाने सर्वप्रथम न्यूझीलंडविरुद्ध ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. त्यानंतर त्यांनी भारताचा पराभव केला. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. एकूण सातपैकी चार सामन्यांत इंग्लंडने चाैथ्या डावात २५० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. तसेच आफ्रिकेविरुद्ध एक सामना डावाने जिंकला. त्यामुळे आक्रमक शैलीत खेळतानाही यश संपादन करणे शक्य असल्याचे इंग्लंडच्या संघाने सिद्ध केले आहे.

पाकिस्तानविरुद्ध विक्रमी कामगिरी…

पाकिस्तानविरुद्धचा कसोटी सामना इंग्लंडसाठी खास ठरला. पाकिस्तानमध्ये हा इंग्लंडचा १७ वर्षांत पहिला कसोटी सामना होता. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने ७५ षटकांत ४ बाद ५०६ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कोणत्याही संघाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावे होता. त्यांनी १९१० मध्ये सिडनी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ४९४ धावा केल्या होत्या. इंग्लंडसाठी झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप आणि हॅरी ब्रूक यांनी शतके साकारली. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चार फलंदाजांनी शतके करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

हेही वाचा : मेहिदी हसन मिराजचा विक्रमी भागीदारी बाबत मोठा खुलासा; म्हणाला, ‘मी फक्त मुस्तफिझुरला…’

‘बॅझबॉल’चा धोका काय?

मॅककलमच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडच्या कसोटी संघाने यशस्वी आणि लक्षवेधी कामगिरी केली असली, तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका सामन्यात त्यांच्या खेळातील उणिवा आणि ते पत्करत असलेल्या धोक्याचे परिणाम दिसून आले होते. कॅगिसो रबाडा, आनरिख नॉर्किए, लुन्गी एन्गिडी आणि मार्को जॅन्सेन या आफ्रिकेच्या गुणवान वेगवान चौकडीपुढे इंग्लंडची आक्रमक शैली चालू शकली नव्हती. इंग्लंडला दोन्ही डावांत २०० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. तसेच इंग्लंडचे बहुतांश फलंदाज चुकीचे फटके मारून बाद झाले. चांगले चेंडू खेळून काढण्याचा संयम त्यांच्यात नव्हता. त्यामुळे इंग्लंडने हा सामना गमावला होता. इंग्लंडची आक्रमक शैली प्रत्येक वेळी यशस्वी होऊ शकत नाही हे या वेळी स्पष्ट झाले होते. परंतु त्यानंतर इंग्लंडला पुढील दोन सामन्यांत पुनरागमन करण्यात यश आले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 11:15 IST
Next Story
विश्लेषण: निवडणूक रोखे योजनेचे भवितव्य काय? सत्ताधाऱ्याविरुद्ध विरोधकांची तक्रार काय?