IND vs ENG Abhishek Sharma Credits Century to 3 Indian Players: अभिषेक शर्माने इंग्लंडविरूद्ध पाचव्या टी-२० सामन्यात वानखेडेच्या मैदानावर वादळी खेळी केली. अभिषेकने भारतासाठी टी-२० क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या उभारली आहे. अभिषेकने १७ चेंडूत अर्धशतक, ३७ चेंडूत शतक झळकावत इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यासह अभिषेकने ५४ चेंडूत १३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने १३५ धावांची खेळी करत भारताला विक्रमी धावसंख्या उभारण्यात मोठी भूमिका बजावली. अभिषेकने त्याच्या शतकानंतर भारतीय संघाच्या तीन सिनियर खेळाडूंना त्याच्या शतकाचं श्रेय दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिषेकच्या शतकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचे शतक जवळ येताच त्याने त्याच्या वेगवान फलंदाजीला आळा घातला. अभिषेकने रविवारी अवघ्या १७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि शतक पूर्ण करण्यासाठी त्याने २० चेंडू घेतले. एका टोकाकडून विकेट पडत होत्या पण त्याच्या वादळी फलंदाजीमुळे संघाने चांगली धावसंख्या उभारली होती.

अभिषेक शर्मा सुरूवातीपासून अगदी बाद होईपर्यंत मोठमोठे फटके खेळत वादळी फलंदाजी करताना दिसतो. त्याने त्याच्या याच खेळींच्या जोरावर आयपीएलमध्ये त्याच्या संघासाठी अनेक मॅचविनिंग खेळी केल्या आहेत. पण अभिषेकने सामन्यानंतर खुलासा केला की भारताच्या वरिष्ठ खेळाडूंनी त्याला आपले शतक पूर्ण कर सांगत त्याच्या फटकेबाजीचा वेग कमी करण्याचा सल्ला दिला. या फलंदाजाने सांगितले की, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी त्याला प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याऐवजी वेग कमी करण्यास सांगितले.

अभिषेकने सामन्यानंतरच्या कार्यक्रमात या तिघांचे आभार मानले आणि असे म्हटले की जर ते नसते तर त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना जबरदस्त फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली असती. अभिषेक म्हणाला, “मी खरं सांगू तर जेव्हा सूर्या पाजी (सूर्यकुमार यादव) आऊट झाले तेव्हा त्याने मला पहिलं शतक पूर्ण करायला सांगितलं. ते म्हणाले की, असे क्षण खूपदा येत नाहीत. त्यावेळी आदिल रशीद आणि वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत होते, ज्यांच्याविरूद्ध मी आधीच धावा केल्या होत्या, पण त्यांनी मला ठणकावून सांगितलं की हे क्षण वारंवार येणार नाहीत आणि शतक होईपर्यंत थोडं शांतपणे खेळण्यासाठी सांगितलं, असे अभिषेक शर्माने सामन्यानंतर प्रसारकांना सांगितले.”

“त्यानंतर हार्दिक (पंड्या) पाजी आले आणि त्यांनी सुद्धा तेच सांगितलं. ते म्हणाले, “तू खूप मोठे फटके खेळले आहेस, आता जरा थांब आणि धाडसी फटके खेळू नको’. त्यानंतर अक्षर (पटेल) पाजी आले आणि त्यांनीही आधी शतक पूर्ण करण्याचा सल्ला दिला. तिन्ही सिनियर्सने मला प्रथम शतक पूर्ण करण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे मी शांतपणे खेळलो. त्यानंतर मला चेंडू पाहून माझे शॉट्स खेळायचे होते पण त्या तिघांनी माझ्या मोठ्या शॉट्सवर नियंत्रण आणलं आणि त्यामुळे हे शतक झालं, असं अभिषेक शर्माने पुढे सांगितलं.”

अभिषेक शर्माने या १३५ धावांच्या अनेक विविध विक्रमांनी गवसणी घातली. यानंतर त्याने गोलंदाजी करताना एका षटकात दोन विकेट्स घेत अजून एक मोठी कामगिरी केली. एकाच टी-२० सामन्यात शतक आणि २ विकेट्स घेणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek sharma credits suryakumar yadav hardik pandya axar patel for his fastest century in ind vs eng bdg