Gautam Gambhir statement on Ben Stokes : गौतम गंभीर क्वचितच क्रिकेटच्या मैदानावर हलके-फुलके क्षण शेअर करताना दिसतो. गंभीरचा स्वभावही आडनावाप्रमाणेच गंभीर आहे. भारताच्या माजी सलामीवीराला वास्तविक जीवनातही गंभीर राहणे आवडते. क्रिकेटच्या मैदानावर हलके-फुलके क्षण घालवायचे विसरून जा, त्याच्या चेहऱ्यावर हसूही क्वचितच पाहिला मिळते. मात्र, विश्वचषक विजेता इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सबद्दल बोलताना एक मजेदार विनोद करण्यापासून तो स्वतःला रोखू शकला नाही. ज्यामध्ये त्याने बेन स्टोक्स दिल्लीत कोणत्या कारणामुळे लोकप्रिय आहे, याबद्दल सांगितले.

म्हणून बेन स्टोक्स दिल्लीतील लोकांचा लोकप्रिय खेळाडू –

स्पोर्ट्सकीडाला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, गौतम गंभीरने जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंबद्दल सांगताना आंद्रे रसेल आणि कॅमेरॉन ग्रीन सारख्या खेळाडूंचा उल्लेख केला. मात्र, त्याने यादरम्यान बेन स्कोक्सच्या नावाचा खास उल्लेख केला. यानंतर शोच्या होस्टने गौतम गंभीरला विनोदाने दिल्लीतील स्टोक्सच्या लोकप्रियतेबद्दल विचारले. प्रत्युत्तरात, माजी क्रिकेटपटू आनंदाने म्हणाला की, “बेन स्टोक्स हा दिल्लीतील लोकांचा चुकीच्या कारणांमुळे आवडता खेळाडू आहे. तो आणखी एका कारणासाठी त्यांचा आवडता खेळाडू असावा. कारण तो दर्जेदार खेळाडू आहे. त्याच्याकडे अविश्वसनीय गुणवत्ता आहे.”

बेन स्टोक्सच्या नावाचा उच्चार हा हिंदीतील अतिशय लोकप्रिय अपशब्दासारखा आहे. कारण भूतकाळात काही विनोदी घटना घडल्या आहेत. अनेकवेळा विराट कोहली मैदानावर असेच अपशब्द वापरताना दिसला आहे. खरे तर खुद्द स्टोक्सने नुकतीच खिल्ली उडवली होती. २०१९ मध्ये, स्टोक्सने ट्विटरवर असे सांगितले होते की, कोहलीने प्रत्येक वेळी त्याच्या नावाचा उल्लेख केलेल्या ट्विटद्वारे त्याला सतत लक्ष्य केले जात असल्यामुळे तो कदाचित त्याचे ट्विटर खाते डिलीट करु शकतो. स्टोक्सने लिहिले होते की, “मी ट्विटर हटवू शकतो. त्यामुळे मला दुसरे ट्विट कधीच पाहावे लागणार नाही.” पुढे बोलताना गौतम गंभीरने त्याच्या क्रीडा कारकीर्दीबद्दल आणि गोलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात करूनही त्याने अष्टपैलू बनण्याचा निर्णय का घेतला नाही? याबद्दलही खुलासा केला.

हेही वाचा – RR vs PBKS : २२ वर्षीय रियान परागचा मोठा पराक्रम! मिचेल मार्श आणि सूर्यकुमार यादवच्या खास क्लबमध्ये झाला सामील

अष्टपैलू खेळाडूबद्दल गौतम गंभीरची प्रतिक्रिया –

भारताच्या सर्वोत्कृष्ट सलामीच्या फलंदाजांपैकी एक असलेल्या गंभीरने सांगितले की, “मी कधीच अष्टपैलू बनण्याचा विचार केला नाही. खरं तर मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात एक गोलंदाज म्हणून केली होती. मी अष्टपैलू होण्याचा कधीच विचार केला नव्हता. कारण जेव्हा मी सलामीवीर म्हणून फलंदाजी करायला सुरुवात केली, तेव्हा मी पूर्णपणे फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळणे हे खूप आव्हानात्मक असते.”

माजी क्रिकेटपटू पुढे म्हणाला, “जर तुम्ही कसोटी क्रिकेटबद्दल बोलत असाल, तर मला वाटत नाही जे सलामीचे फलंदाज होते, ते अष्टपैलू देखील होते. हे एक विशेष काम आहे. कल्पना करा की तुम्हाला १५०-१६० षटके क्षेत्ररक्षण करावे लागेल आणि काही षटके टाकावी लागतील. नंतर १० मिनिटे ब्रेक घेतल्यानंतर तुम्हाला सलामीला फलंदाजीसाठी यावे लागेल. अशा वेळी शरीराची रिकव्हरी पहिल्यासारखी नसते आणि मानसिक कौशल्ये देखील पहिल्यासारखी नसतात.”