टोरंटो : भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशने ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेच्या ११व्या फेरीत अमेरिकेच्या अग्रमानांकित फॅबियानो कारुआनाला बरोबरीत रोखले. मात्र, या निकालानंतरही गुकेशची गुणतालिकेत संयुक्त दुसऱ्या स्थानी घसरण झाली. खुल्या विभागातील अन्य दोन भारतीय बुद्धिबळपटूंना पराभव पत्करावा लागल्याचा फटका गुकेशला बसला.

भारताच्या आर. प्रज्ञानंद आणि विदित गुजराथी यांना ११व्या फेरीत अनुक्रमे अमेरिकेचा हिकारू नाकामुरा आणि रशियाचा इयान नेपोम्नियाशी यांनी पराभूत केले. या फेरीपूर्वी १७ वर्षीय गुकेश आणि गेल्या दोन ‘कॅन्डिडेट्स’मधील विजेता नेपोम्नियाशी संयुक्त आघाडीवर होते. मात्र, गुकेश आता अर्ध्या गुणाने मागे पडला आहे. खुल्या विभागातील अन्य एका लढतीत फ्रान्सच्या अलिरेझा फिरुझाने अझरबैजानच्या निजात अबासोववर विजय मिळवला.

या स्पर्धेच्या आता केवळ तीन फेऱ्या शिल्लक असून नेपोम्नियाशीने (७ गुण) अग्रस्थान भक्कम केले आहे. गुकेश आणि नाकामुरा प्रत्येकी ६.५ गुणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानी आहेत. कारुआना सहा गुणांसह चौथ्या स्थानी असून प्रज्ञानंदची ५.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. विदित सहा गुणांसह सहाव्या, फिरुझा ४.५ गुणांसह सातव्या, तर अबासोव तीन गुणांसह आठव्या आणि अखेरच्या स्थानावर आहे. अबासोव आता जेतेपदाच्या शर्यतीतून अधिकृतरीत्या बाहेर गेला आहे.

हेही वाचा >>> IPL 2024: मुंबईनं पंजाबच्या तोंडचा घास पळवला

महिलांमध्ये, चीनच्या बुद्धिबळपटूंचे वर्चस्व कायम राहिले. टॅन झोंगीने रशियाच्या कॅटेरिना लायनोवर मात करताना पुन्हा अग्रस्थान मिळवले. झोंगीच्या खात्यावर आता सात गुण आहेत. चीनचीच ले टिंगजी सात गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. ११व्या फेरीत तिला युक्रेनच्या अ‍ॅना मुझिचुकविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. भारताच्या आर. वैशालीने अग्रमानांकित रशियाच्या अलेक्झांड्रा गोर्याचकिनाला पराभवाचा धक्का दिला. तसेच कोनेरू हम्पीने गुणतालिकेत तळाला असणाऱ्या बल्गेरियाच्या नुरग्युल सलिमोवावर सरशी साधली. हम्पी ५.५ गुणांसह आता संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर आली आहे.

खुल्या विभागात ११व्या फेरीत भारताची निराशा झाली. कारुआनाला बरोबरीत रोखल्यानंतर गुणतालिकेतील संयुक्त आघाडी कायम राखण्यासाठी गुकेशला विदितकडून मदतीची गरज होती. मात्र, पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या विदितने पटावरील चांगली स्थिती गमावताना नेपोम्नियाशीकडून हार पत्करली. सुरुवातीला विदितला नेपोम्नियाशीच्या पेट्रॉफ बचावाचा सामना करावा लागला. नेपोम्नियाशी २०१८ पासून या बचावपद्धतीचा खुबीने वापर करत आहे. मात्र, विदितने नेपोम्नियाशीला चांगली टक्कर दिली आणि डावाच्या मध्यात स्वत:साठी चांगली स्थिती निर्माण केली. परंतु नेपोम्नियाशीनेही अनुभव पणाला लावताना लढतीतील आपले आव्हान कायम राखले. यानंतर वेळेअभावी विदितकडून बऱ्याच चुका झाल्या आणि नेपोम्नियाशीने लढतीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. त्याने सहजपणे विदितची प्यादी टिपताना अखेर ६७ चालींअंती विजयाची नोंद केली. या पराभवानंतर विदित अत्यंत निराश झालेला दिसला.

११व्या फेरीचे निकाल

* खुला विभाग : डी. गुकेश

(एकूण ६.५ गुण) बरोबरी वि. फॅबियानो कारुआना (६), विदित गुजराथी (५) पराभूत वि. इयान नेपोम्नियाशी (७), आर. प्रज्ञानंद (५.५) पराभूत वि. हिकारू नाकामुरा (६.५), अलिरेझा फिरुझा (४.५) विजयी वि. निजात अबासोव (३).

* महिला विभाग : कोनेरू हम्पी

(एकूण ५.५ गुण) विजयी वि. नुरग्युल सलिमोवा (४), आर. वैशाली (४.५) विजयी वि. अलेक्झांड्रा गोर्याचकिना (५.५), टॅन झोंगी (७.५) विजयी वि. कॅटेरिना लायनो (५.५), ले टिंगजी (७) बरोबरी वि. अ‍ॅना मुझिचुक (४.५). विश्रांतीच्या दिवसानंतर पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या भारतीय पुरुष बुद्धिबळपटूंसाठी ‘कॅन्डिडेट्स’ची ११वी फेरी अत्यंत निराशाजनक ठरली. महिलांमध्ये कोनेरू हम्पी आणि वैशाली यांच्या विजयांचा काय तो भारताला दिलासा मिळाला. वैशालीविरुद्धच्या पराभवामुळे अग्रमानांकित गोर्याचकिनाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. महिलांमध्ये जी अवस्था गोर्याचकिनाची, तीच पुरुषांमध्ये प्रज्ञानंद आणि विदितची झाली आहे. हिकारू नाकामुरा आणि इयान नेपोम्नियाशी यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर प्रज्ञानंद आणि विदितवर विजय मिळवले. या दमदार कामगिरीमुळे नेपोम्नियाशीने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे, तर गुकेश आणि नाकामुरा दुसऱ्या स्थानी आहे. नाकामुराने जलदगती सामन्यात वापरल्या जाणाऱ्या खेळींचा उपयोग करून प्रज्ञानंदला गोंधळवून टाकले. वेळेअभावी प्रज्ञानंदने शेवटी चुका करून आपला घोडा गमावला. विदितकडे वेळ कमी असल्याचा फायदा घेत नेपोम्नियाशीने धोका पत्करून खेळ केला आणि विजय मिळवला. विदितला डावाच्या मध्यात जिंकण्याची संधी आली होती, पण वेळेअभावी त्याला ती घेता आली नाही. आता उरलेल्या तीन फेऱ्यांत नेपोम्नियाशीला प्रज्ञानंद, नाकामुरा आणि कारुआना यांच्याशी खेळायचे आहे. १३व्या फेरीतील नेपोम्नियाशी-नाकामुरा लढत निर्णायक ठरू शकेल. – रघुनंदन गोखले, बुद्धिबळ प्रशिक्षक.