बुडापेस्ट : या वर्षाअखेरीस जगज्जेतेपदासाठी लढण्याची संधी मिळणार असली, तरी ऑलिम्पियाड स्पर्धेदरम्यान आपण त्याबाबत विचारही न केल्याचे मनोगत भारताचा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू डी. गुकेशने व्यक्त केले.गुकेशने याच वर्षी ‘कँडिडेट्स’ स्पर्धेचे जेतेपद पटकावत जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीसाठी पात्रता मिळवली. त्यामुळे त्याला विद्यामान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनला आव्हान देण्याची संधी मिळणार आहे. ही लढत २५ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत सिंगापूर येथे रंगणार आहे. या लढतीसाठी आपण पूर्णपणे सज्ज असल्याचे गुकेशने ऑलिम्पियाडमध्ये दाखवून दिले. त्याने सर्वांत अवघड मानल्या जाणाऱ्या पहिल्या पटावर खेळताना १० सामन्यांत ९ गुणांसह वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘ऑलिम्पियाड ही खूप प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेदरम्यान मी जगज्जेतेपदाच्या लढतीचा अजिबातच विचार करत नव्हतो. त्या लढतीच्या तयारीसाठी माझ्याकडे अजून थोडा वेळ आहे. या काळात मी मेहनत घेईन आणि लढतीसाठी पूर्णपणे सज्ज असेन. मात्र, ऑलिम्पियाड स्पर्धेतील कामगिरीमुळे मी चांगल्या लयीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. माझा आत्मविश्वासही दुणावला आहे,’’ असे गुकेशने नमूद केले.

हेही वाचा >>>IND vs BAN : ‘ऋषभ पंतचे कसोटीतील पुनरागमन हे क्रिकेटच्या इतिहासातील…’, ॲडम गिलख्रिस्टचे वक्तव्य

तसेच सरावाविषयी विचारले असता गुकेश म्हणाला, ‘‘मला फारसे छंद नाहीत. त्यामुळे घरी असतानाही मी थोडाफार सराव करतोच. परंतु, सतत खेळत राहिल्यास ऊर्जा संपण्याची आणि थकवा जाणवण्याची भीती असते. याच कारणास्तव स्पर्धा खेळत नसताना मी सहा ते आठ तासच सराव करतो. तसेच दडपणाचा खेळावर परिणाम होऊ नये यासाठी मी योग आणि ध्यान करतो. कारकीर्दीच्या सुरुवातीला मी दडपणाचा सामना करण्यात कमी पडायचो. आता अनुभवाने मी अधिक परिपक्व झालो आहे.’’

लिरेनविरुद्ध कस

गुकेशच्या खेळात मोठी सुधारणा झाली असून तो चांगल्या लयीतही आहे. मात्र, जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत डिंग लिरेनविरुद्ध खेळताना त्याचा कस लागेल, असे मत हंगेरीचा ग्रँडमास्टर रिचर्ड रॅपपोर्टने व्यक्त केले. गेल्या जागतिक अजिंक्यपद लढतीत रॅपपोर्टने लिरेनचा दुसरा प्रशिक्षक (सेकंड) म्हणून काम केले होते. ‘‘ऑलिम्पियाड स्पर्धेतील कामगिरीमुळे जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीतही गुकेशचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, ही लढत पूर्णपणे वेगळी असेल. लिरेनच्या गाठीशी अनुभव आहे आणि याचा त्याला फायदा होऊ शकेल. त्यामुळे गुकेशचा कस लागेल,’’ असे रॅपपोर्ट म्हणाला. परंतु गुकेश नवा विश्वविजेता होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्याने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India grandmaster chess player d gukesh expressed that he did not even think about it during the chess olympiad sport news amy