विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याची संधी गमावली आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडला २३५ धावांत बाद केल्यानंतर भारतीय संघाला ७ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावातही भारतीय डावाची अक्षरशः घसरगुंडी उडाली. ट्रेंट बोल्ट आणि इतर न्यूझीलंड गोलंदाजांच्या भन्नाट माऱ्यासमोर टीम इंडियाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताची अवस्था ६ बाद ९० अशी झालेली असून सध्या संघाकडे ९७ धावांची आघाडी आहे. हनुमा विहारी आणि ऋषभ पंत हे फलंदाज सध्या खेळपट्टीवर असून तिसऱ्या दिवशी हे फलंदाज भारताची आघाडी कितीने वाढवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – न्यूझीलंड दौऱ्यातील अखेरच्या डावातही विराट सपशेल अपयशी
दरम्यान दुसऱ्या डावातही भारताचा सलामीवीर मयांक अग्रवाल अपयशी ठरला. ट्रेंट बोल्टने पायचीत बळी घेत त्याला माघारी धाडलं. यानंतर टीम इंडियाला लागलेली गळती काहीकेल्या थांबलीच नाही. पृथ्वी शॉ, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा हे भारताचे बिनीचे शिलेदार एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी हवामानाचा पुरेपूर फायदा घेत चेंडू हवेत वळवले. अजिंक्य-चेतेश्वर पुजारा यांची विकेट पाहण्यासारखी होती. त्यामुळे उद्याच्या दिवशी भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कसा प्रतिकार करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – Video : रविंद्र जाडेजाचा हा भन्नाट झेल पाहिलात का?
त्याआधी, सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला तळातल्या फलंदाजांनी हैराण केलं. भारतीय संघाने दिलेल्या २४२ धावांचा पाठलाग करताना पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने ५ गडी गमावले. यानंतर दुसऱ्या सत्रातही भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. मात्र तळातल्या फळीतील कॉलिन डी-ग्रँडहोम, कायल जेमिसन आणि निल वँगर या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरामुळे न्यूझीलंडने भारताला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपल्यामुळे, भारताला अवघ्या ७ धावांची आघाडी मिळाली. जेमिसनने फटकेबाजी करत ४९ धावा केल्या.
दिवसाच्या सुरुवातीला, टॉम ब्लंडलला माघारी धाडत उमेश यादवने दुसऱ्या दिवशी भारताला पहिलं यश मिळवून दिलं. ब्लंडल आणि लॅथम यांनी पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. यानंतर मैदानात आलेला कर्णधार विल्यमसनही स्वस्तात माघारी परतला. यानंतर न्यूझीलंडने सर्व प्रथितयश फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. भारतीय गोलंदाजांनी योग्य टप्प्यावर शिस्तबद्ध मारा केल्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांना धावा करणं कठीण जात होतं.
दुसऱ्या सत्रातही बुमराहने वॉटलिंग आणि साऊदी यांना एकाच षटकात माघारी धाडलं. मात्र यानंतर तळातल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. जेमिसन-वँगर आणि डी-ग्रँडहोम या त्रिकुटकाने फटकेबाजी करत धावा जमवण्यास सुरुवात केली. भारतीय क्षेत्ररक्षकांनी दिलेल्या जिवदानाचाही न्यूझीलंडच्या फलंदाजांनी फायदा घेतला. मात्र पहिल्या डावात न्यूझीलंड आघाडी घेणार असं वाटत असतानाच, मोहम्मद शमीने जेमिसनला माघारी धाडत न्यूझीलंडचा डाव संपवला. पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद शमीने ४, जसप्रीत बुमराहने ३, रविंद्र जाडेजाने २ तर उमेश यादवने १ बळी घेतला.
Highlights
भारताची ६ बाद ९० पर्यंत मजल, संघाकडे ९७ धावांची आघाडी
ऋषभ पंत - हनुमा विहारी जोडीवर भारताची भिस्त
ट्रेंट बोल्टने भन्नाट स्विंग चेंडू टाकत उडवला उमेशचा त्रिफळा, भारताचे ६ गडी बाद
भन्नाट इन स्विंगरवर पुजारा त्रिफळाचीत, भारतीय संघ अडचणीत
निल वँगरच्या गोलंदाजीवर अजिंक्यने स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
९ धावांवर वँगरने उडवला रहाणेचा त्रिफळा
कॉलिन डी-ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर विराट पायचीत, भारताची अडखळती सुरुवात
अवघ्या १४ धावा काढत विराट बाद
टीम साऊदीच्या गोलंदाजीवर टॉम लॅथमने घेतला झेल, भारताचे सलामीवीर माघारी परतले
मयांक अग्रवाल ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी
यष्टीरक्षक पंतने घेतला झेल, एका धावेने जेमिसनचं अर्धशतक हुकलं
पहिल्या डावात न्यूझीलंडची २३५ धावांपर्यंत मजल, भारताकडे अवघ्या ७ धावांंची आघाडी
मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात निल वँगर झेलबाद
सीमारेषेवर रविंद्र जाडेजाने घेतला भन्नाट झेल, न्यूझीलंडचा नववा गडी माघारी
निल वँगर आणि कायल जेमिसन जोडीची फटकेबाजी
नवव्या विकेटसाठी महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी
कॉलिन डी-ग्रँडहोम त्रिफळाचीत होऊन माघारी, यजमानांना आठवा धक्का
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बी.जे.वॉटलिंग आणि टीम साऊदी माघारी
न्यूझीलंड अद्यापही १०० धावांनी पिछाडीवर
दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीने घेतला सुरेख झेल, मोहम्मद शमीने घेतला बळी
टप्पा पडून आत येणारा चेंडू सोडून देण्याची चूक लॅथमला भोवली
५२ धावांवर लॅथम त्रिफळाचीत, शमीने घेतला बळी
न्यूझीलंडची झुंज सुरुच
रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात टेलर झेलबाद
उमेश यादवने घेतला सुरेख झेल, टेलरच्या अवघ्या १५ धावा
सलामीवीर टॉम लॅथमची अनुभवी रॉस टेलरच्या साथीने मैदानात झुंज सुरुच
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक पंतकडे झेल देत विल्यमसन बाद, केल्या अवघ्या ३ धावा
उमेश यादवच्या गोलंदाजीवर ब्लंडल पायचीत, पंचांच्या निर्णयाला DRS द्वारे आव्हान
मात्र तिसऱ्या पंचांच्या पाहणीतही ब्लंडल बाद असल्याचं निष्पन्न, उमेशने यजमानांची जोडी फोडली
ब्लंडलच्या ३० धावा, पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी