भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या खराब कामगिरीचं सत्र दुसऱ्या कसोटी सामन्यातही चालूच राहिलं आहे. पहिल्या डावात अवघ्या ७ धावांची आघाडी घेतलेल्या भारतीय संघाची दुसऱ्या डावातही सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल हे सलामीवीर झटपट माघारी परतल्यानंतर विराट आणि पुजारा या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र कॉलिन डी-ग्रँडहोमने १४ धावांवर विराटला पायचीत करत भारताला धक्का दिला.

यासोबतच विराट कोहलीचा फलंदाजीतला अपयशी न्यूझीलंड दौरा संपुष्टात आला आहे. ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेपासून सुरु झालेल्या या दौऱ्यात विराट कोहलीने आतापर्यंत केवळ एक अर्धशतक लगावलं आहे. कसोटी मालिकेत विराट कोहली पूर्णपणे अपयशी ठरला आहे.

न्यूझीलंड दौऱ्यातली विराट कोहलीची कामगिरी –

  • टी-२० मालिका : ४५, ११, ३८, ११
  • वन-डे मालिका : ५१, १५, ९
  • कसोटी मालिका : २, १९, ३, १४

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २० धावसंख्याही न ओलांडू शकण्याची विराट कोहलीची ही दुसरी वेळ ठरली आहे.

याचसोबत या मालिकेतली विराटने निचांकी सरासरीचीही नोंद केली आहे.

दरम्यान, सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला तळातल्या फलंदाजांनी हैराण केलं. भारतीय संघाने दिलेल्या २४२ धावांचा पाठलाग करताना पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने ५ गडी गमावले. यानंतर दुसऱ्या सत्रातही भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. मात्र तळातल्या फळीतील कॉलिन डी-ग्रँडहोम, कायल जेमिसन आणि निल वँगर या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरामुळे न्यूझीलंडने भारताला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं. न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपल्यामुळे, भारताला अवघ्या ७ धावांची आघाडी मिळाली.