RCB Gives Guard of Honour to Dinesh Karthik: भारताचा फिनिशर आणि स्टार यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या दिनेश कार्तिकने आयपीएलला अलविदा केले आहे. कार्तिकचा राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामना हा अखेरचा आयपीएल सामना होता. हा हंगाम सुरु होण्यापूर्वीच दिनेश कार्तिकने घोषणा केली होती की हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम असेल. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीकडून झालेल्या पराभवानंतर जेव्हा तो ड्रेसिंग फॉर्ममध्ये परतत होता, तेव्हा त्याने हातात ग्लोव्हज घेऊन प्रेक्षकांचे आभार मानत त्यांचा निरोप घेतला. यावरून त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळल्याचे नक्की झाले.

आरसीबीच्या पराभवानंतर संपूर्ण आऱसीबी संघासह दिनेश कार्तिकचा चेहराही उतरला होता, विराटने त्याची गळाभेट घेत त्याचे सांत्वन केले. कार्तिकने अद्याप अधिकृतपणे आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केलेली नाही, परंतु आयपीएल २०२४ हा त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो असे त्याने सूचित केले होते.

हेही वाचा – हार्दिक पंड्या – नताशा स्टॅनकोविक विभक्त होणार? इन्स्टाग्रामवर केला मोठा बदल, चर्चांना उधाण

राजस्थानविरुद्ध ४ विकेट्सच्या पराभवानंतर आरसीबीच्या सहकाऱ्यांनीही दिनेश कार्तिकला भावनिक निरोप दिला. ज्याचा व्हीडिओ आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून शेअर करण्यात आला. या व्हीडिओमध्ये कार्तिक सर्वांना भेटत होता, तर चाहत्यांना ग्लोव्हज दाखवत त्यांचे आभार मानून निरोप घेत होता. तर संपूर्ण आऱसीबी संघ त्याच्यामागे चालत होता. आरसीबीच्या स्टार्ससाठी हा पराभव निराशाजनक होता कारण त्यांचा आयपीएल २०२४ मधील प्रवास या सामन्यासह संपुष्टात आला होता. आरसीबी हंगामाच्या पहिल्या टप्प्यात पॉइंट टेबलच्या तळाशी होता, ८ पैकी फक्त १ सामना संघाने जिंकला. त्यानंतर RCBने सलग सहा विजयांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला, ज्यामध्ये ५ वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला.

दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये एकूण २५७ सामने खेळले, ज्यात त्याने ४८४२ धावा केल्या. यादरम्यान त्याने २२ अर्धशतकेही झळकावली आहेत. कार्तिकचा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या १० खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. कार्तिक आयपीएलमध्ये एकूण सहा संघांसाठी खेळताना दिसला. त्याने २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. किंग्ज इलेव्हन पंजाब संघात तो २०११ साली गेला. त्यानंतर त्याने मुंबई इंडियन्सकडून दोन हंगाम खेळले, ज्यामध्ये आयपीएल ट्रॉफी उचलण्याची त्याला संधी मिळाली. त्यानंतर २०१४ मध्ये दिल्ली संघात परतला.

आरसीबीने २०१५ मध्ये कार्तिकला संघात दाखले केले. त्यानंतर तो २०१६ आणि २०१७ मध्ये तो गुजरात लायन्ससाठी खेळला आणि नंतर केकेआरकडून चार हंगाम खेळला, ज्याचे त्याने कर्णधारपदही भूषवले होते. कार्तिक २०२२ मध्ये आरसीबीमध्ये परतला आणि त्याने फिनिशरची भूमिका उत्तमरित्या निभावली.