रोहित नेतृत्वासाठी सज्ज ; विंडीजविरुद्धच्या मालिकांसाठी अश्विन, भुवनेश्वरला वगळण्याची शक्यता

मुंबईत रोहितने सरावाला प्रारंभ केला असून, त्याला बेंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्ती चाचणीला सामोरे जावे लागेल.

Rohit Sharma on next captain of Team India
रोहित शर्मा

नवी दिल्ली : दुखापतीतून सावरलेला रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी भारताचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतील खराब कामगिरीमुळे रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार या अनुभवी खेळाडूंना वगळले जाण्याची दाट शक्यता आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन मालिकांपैकी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला ६ फेब्रुवारीला अहमदाबाद येथे प्रारंभ होणार आहे. यानंतर ट्वेन्टी-२० मालिका कोलकाता येथे होणार आहे. या मालिकांसाठी भारतीय संघाची निवड येत्या आठवडय़ात जाहीर होईल. मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे आफ्रिकेच्या दौऱ्यातून माघार घेणारा रोहित हा तंदुरुस्त असून, संघनिवडीसाठी उपलब्ध आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली. रोहितला साडेसात आठवडे आठवडय़ांची विश्रांती मिळाली आहे. मुंबईत रोहितने सरावाला प्रारंभ केला असून, त्याला बेंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्ती चाचणीला सामोरे जावे लागेल.

आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ०-३ असा मानहानीकारक पराभव पत्करल्यामुळे फिरकी गोलंदाज अश्विन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वरला डच्चू मिळू शकतो. त्यामुळे आवेश खान आणि हर्षल पटेल या नावांचाही निवड समिती विचार करू शकते.

हार्दिक, जडेजाचे पुनरागमन

सहाव्या क्रमांकाला न्याय देण्यात वेंकटेश अय्यरचे अपयश आणि राहुल द्रविडचे संकेत या पार्श्वभूमीवर गोलंदाजीचा सराव सुरू करणाऱ्या अष्टपैलू हार्दिक पंडय़ाच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर हार्दिकला संघातून वगळण्यात आले होते. याचप्रमाणे अष्टपैलू रवींद्र जडेजाही भारतीय संघात परतण्याची शक्यता आहे.

बुमराला विश्रांती?

खेळाचा ताण सांभाळण्याच्या दृष्टीने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सहा सामन्यांसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय असे सहाही सामने बुमरा खेळला होता. या दौऱ्यात सर्वाधिक १०४.५ कसोटी षटके आणि ३० एकदिवसीय षटके त्याने टाकली होती.

रोहित कसोटी कर्णधार?

मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारांप्रमाणेच भारताच्या कसोटी संघाचेही नेतृत्व रोहितकडेच सोपवले जाण्याची शक्यता आहे. मात्र ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धाच्या ताणाच्या पार्श्वभूमीवर रोहितकडे तात्पुरते कसोटी कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohit sharma set to lead india in limited overs series against west indies zws

Next Story
प्रो कबड्डी लीग : दोन संघांमधील खेळाडूंना करोना झाल्याने वेळापत्रकात बदल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी