Differences between dengue and a monsoon fever : पावसाळा हा अनेकांना आवडणारा ऋतू आहे. पावसामुळे उष्णता कमी होऊन वातावरणात गारवा जाणवतो. त्यात निसर्गाच्या सौंदर्यात आणखी भर पडते, पण हे विसरता कामा नये की पावसाळ्यात सर्वात जास्त रोगराईसुद्धा पसरते आणि आजार वाढतात. ताप, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढतात.
सध्या डेंग्यूने सर्वत्र थैमान घातले आहे. अनेकदा पावसाळी आजारपण समजून आपण डेंग्यूसारख्या भयानक आजाराकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. डेंग्यू आणि पावसाळी आजार यातील फरक कसा ओळखावा, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुशीराबाद येथील केअर हॉस्पिटलचे इंटरर्नल मेडिसीन सल्लागार डॉ. मोईनुद्दीन यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना डेंग्यू आणि पावसाळी आजार यातील फरक आणि पावसाळ्यात निरोगी कसे राहावे, याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.

पावसाळी ताप

पावसाळी ताप हा हवामानात झालेला अचानक बदल, रोगप्रतिकारशक्ती कमी असणे आणि विविध व्हायरल इन्फेक्शनमुळे येतो. यामध्ये सौम्य ताप, खोकला, सर्दी, घसा खवखवणे, अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसून येतात.

डेंग्यू ताप

डेंग्यू ताप हा डासांमुळे पसरणारा आजार आहे. या आजारात शरीराचे तापमान झपाट्याने वाढते. सतत उलट्या होतात, स्नायू आणि सांधेदुखी जाणवते आणि काही वेळा हलका रक्तस्त्राव होतो.

हेही वाचा : सात महिन्यांची गरोदर असूनही ऑलिंपिकमध्ये खेळली; पण गर्भधारणेदरम्यान खेळणं बाळासाठी सुरक्षित आहे का? वाचा डॉक्टरांचे मत…

दोन्ही प्रकारात आरोग्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. फक्त एक साधी रक्त तपासणी करावी, यामुळे तुम्ही तापाचे कारण शोधू शकता आणि वेळेवर योग्य उपचार घेऊ शकता, असे डॉ. मोईनुद्दीन सांगतात. त्वरित उपचार धोका टाळू शकतो आणि आपण त्यातून लवकर बरे होऊ शकतो.

पावसाळी ताप आणि डेंग्यू या दोन्ही प्रकारात तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, पण काही उपायांमुळे धोका कमी होऊ शकतो. आज आपण त्याविषयी जाणून घेऊ या.

रोगप्रतिकारशक्ती वाढवा – रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फळे, भाज्या आणि धान्ये असा संतुलित आहार घ्या.

स्वच्छता ठेवा – आपले हात साबणाने आणि पाण्याने वारंवार धुवा. विशेषतः जेवणापूर्वी आणि शौचालयानंतर हात स्वच्छ धुवा.

डासांवर नियंत्रण ठेवा – आपल्या अवती भोवती पाणी साचू देऊ नका. डासांची उत्पत्ती होऊ शकते, अशी ठिकाणे स्वच्छ करा. घरात डासांपासून सुरक्षित राहा. डासांपासून वाचण्यासाठी शरीर पूर्णपणे झाकले जाईल, असे कपडे परिधान करा.

हायड्रेशन – शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी भरपूर स्वच्छ व उकळलेले पाणी प्या.

अन्न सुरक्षा – रस्त्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळा आणि घरी जेवण तयार करताना स्वच्छता पाळा.

पावसाळी ताप आणि डेंग्यू यांच्यातील फरक समजून घ्या आणि त्यावर योग्य ते उपाय करा व वेळेवर डॉक्टरांची मदत घ्या. तुम्ही पावसाळ्यात निरोगी राहू शकता, त्यासाठी स्वच्छतेला महत्त्व द्या, शरीर हायड्रेटेड ठेवा, डासमुक्त वातावरणात राहा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवा. पावसाळ्यात आजारांविरुद्ध लढण्यासाठी या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to identify the difference between monsoon fever vs dengue read what expert told ndj