How To Clean Water Tanki: आपल्या सर्वांच्या घरात नळ व एक पाण्याची टाकी असते. पूर्वी संपूर्ण बाथरूममध्ये ज्या बादल्या भरून ठेवाव्या लागायच्या ते कष्ट या पाण्याच्या टाकीने कमी केले आहेत. आता रोजच्या वापरात पूर्ण टाकी रिकामी होतेच असं नाही पण मग ही टाकी नेमकी कधी स्वच्छ करायची? बरं हा मुहूर्त मिळाला तरी प्रत्येकाला काय टाकीमध्ये उतरून पाणी उपसून स्वच्छ करणे शक्य होत नाही अशावेळी टाकीत जमा झालेला गाळ कसा बाहेर काढायचा असा प्रश्न असतोच. स्वच्छता न केल्यास यातून आणखी आजारांना आमंत्रण मिळू शकते. आता काहीच दिवसात पावसाळा सुरु होईल. त्याआधी तुम्हालाही तुमच्या घरातील पाण्याची सिंटेक्स टाकी स्वच्छ करायची असेल तर त्यासाठी खालील काही स्टेप्स वापरून पाहू शकता.
पाण्याची टाकी कशी साफ करायची? (How To Clean Water Tank)
१) लक्षात घ्या पाण्याची टाकी स्वच्छ करताना साबण किंवा अगदी फेस येणारी पावडर वापरणे टाळा कारण हा फेस लगेच निघून जात नाही त्यासाठी तुम्हाला भरपूर पाणी वापरावे लागू शकते.
२) दुसरा सोपा उपाय म्हणजे तुम्ही पाण्याच्या टाकीत तुरटी टाकून ठेवू शकता. तुरटीमुळं पाण्याच्या वरच्या बाजूला साचलेली घाण स्थिर होते. आणि मग टाकी स्वच्छ करणे सोपे होते.
३) तुम्ही बाजारातून हायड्रोजन पॅरॉक्साइड आणून ब्लिचिंग पावडर व पाण्यासह त्याचे द्रावण बनवून टाकी घासून पुसून लक्ख करू शकता. शक्यतो यानंतर एकदा पाण्याने टाकी धुवून घ्यायला विसरू नका.
४) एखाद्या दिवशी जर तुमच्याकडे पाणी कपात असेल तर त्याच दिवशी तुम्ही टाकी साफ करण्याचे नियोजन करू शकता. अन्य दिवशी दररोज टाकी पूर्ण रिकामी होतेच असे नाही. जेव्हा पाणी कमी असेल तर सहसा मातीचा गाळ हा खालील बाजूस स्थिर होतो यावर तुम्ही एखादे कापड टाकून ठेवल्यास कापड हा सगळा गाळ शोषून घेऊ शकतो. यासाठी कमी पाणी टाकीत असल्यास मदत होऊ शकते.
५)युट्युबवर @ACA TECHNOLOGIES पेजवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. यामध्ये तरुणाने एक भन्नाट जुगाडू यंत्र बनवले आहे. तो प्लास्टिकची बॉटल अर्धी कापून त्याला साधा पीवीसी पाईप व रबरचा पाईप जोडतो. बॉटलचा मागचा भाग टाकीच्या आत टाकायचा आहे, पाईप जमिनीवर सोडून द्यायचा आहे व मग आपोआपच टाकीच्या तळातील घाण थोड्या थोड्या पाण्यासह निघून बाहेर येताना दिसेल.
टाकी स्वच्छ धुवून झाल्यावर तिला १५ ते २० मिनिट हवेखाली सुकू द्या.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, प्रयोग करताना स्वतःची आवश्यक काळजी घ्यायला विसरू नका)