आधुनिक भारताचे एक शिल्पकार दादाभाई नवरोजी यांच्या स्मृतीशताब्दी (३० जून) निमित्ताने त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा परामर्श..
भारतीय स्वातंत्र्यलढय़ाची पायाभरणी करणारे दादाभाई नवरोजी यांचे हे स्मृतीशताब्दी वर्ष. दादाभाईंचे स्मरण कशासाठी करायचे, तर व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्यांचे स्मरण ठेवण्यासाठी! ‘चांगले सरकार हे काही जनताप्रणीत सरकारला पर्याय ठरू शकत नाही,’ असे ठणकावून सांगणारे दादाभाई!
दादाभाई पालनजी नवरोजी चार वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. आईनेच त्यांचे पालनपोषण केले. तत्कालीन प्रथेप्रमाणे वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. १८४५ मध्ये ते पदवीधर झाले. एलफिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. पुढे याच महाविद्यालयात ते गणित व तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. अशा प्रकारची नेमणूक होणारे ते सर्वप्रथम हिंदी व्यक्ती होत. प्राध्यापकी सुरू असतानाच मूळचा चळवळ्या स्वभाव त्यांना शांत बसू देईना. आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे, हा विचार पुन: पुन्हा मनात येत होता. यातूनच १८५५-५६ च्या सुमारास कामा कंपनीच्या भागीदारीमुळे त्यांना इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली. तेथील वास्तव्यामुळे जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनच बदलून गेला. तिथेही त्यांनी अनेक गोष्टींत रस घ्यायला सुरुवात केली. यातूनच मंॅचेस्टर कॉटन सप्लाय असोसिएशन, कौन्सिल ऑफ लिव्हरपूल, अथेनियम, नॅशनल इंडियन असोसिएशन या संस्थांच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. जोडीला काही काळ लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत राहिले. पुढील दोन दशके त्यांचे भारत-इंग्लंड असे येणे-जाणे राहिले. १८६५ मध्ये दादाभाई आणि डब्ल्यू. सी. बॅनर्जी यांनी ‘लंडन इंडिया सोसायटी’ची स्थापना केली. १८६२ मध्ये ते दादाभाई कामा अँड कंपनीतून बाहेर पडले व त्यांनी स्वत:ची ‘दादाभाई नवरोजी अँड कंपनी’ काढली. १८६६ साली ते ईस्ट इंडिया असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व सचिव झाले.
इंग्लंडमध्ये भारताच्या आर्थिक परिस्थितीच्या पाहणीसंदर्भात तेव्हा एक संसदीय समिती नेमण्यात आली होती. या समितीचे नाव होते- ‘फॉसेट’ समिती. या समितीसमोर दादाभाईंची साक्ष झाली. या साक्षीचा प्रभाव समितीच्या सदस्यांवर पडला. ‘भारतात करांचे प्रमाण अतिरिक्त आहे. आणि भारतीयांचे सरासरी उत्पन्न फक्त वीस रुपये आहे,’ असे त्यांचे मत होते. ही घटना १८७३ मधली.
१८७४ मध्ये दादाभाई भारतात बडोदे संस्थानचे दिवाण म्हणून आले. त्यांचा स्वभाव आणि अभ्यासू वृत्ती पाहता ते अशा सरकारी नोकरीत टिकणे अवघडच होते. व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची त्यांची वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याचे पर्यवसान त्यांच्या राजीनाम्यात झाले. दिवाणपदाचा राजीनामा दिला तरी जनतेशी येणारा संबंध दादाभाईंना टाळता येणार नव्हता. १८७५ मध्ये ते मुंबई नगरपालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले. नगरपालिकेच्या शहर परिषदेचे ते सभासद झाले. दोन वर्षे भारतात काढल्यावर १८७६ मध्ये ते पुन्हा इंग्लंडला गेले. काही वर्षांनी ते भारतात परतले. १८८३ मध्ये त्यांना ‘जस्टिस ऑफ द पीस’ हा बहुमान मिळाला. याचदरम्यान पुन्हा एकदा ते मुंबई नगरपालिकेवर निवडून गेले.
ते ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेचे टीकाकार होते, पण इंग्रजांशी त्यांचं वाकडं नव्हतं. इंग्रज अधिकाऱ्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. यातूनच १८८५ मध्ये गव्र्हनर लॉर्ड रे यांच्या आग्रहास्तव ते प्रांतिक कायदेमंडळाचे सदस्य झाले. काँग्रेसच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दादाभाईंना तीन वेळा या संघटनेच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. काँग्रेसचे कार्य जोरात चालू असतानाच १९०२ मध्ये दादाभाई लंडनस्थित हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लिबरल पक्षातर्फे खासदार म्हणून निवडून आले. असे कर्तृत्व गाजवणारे ते पहिलेच भारतीय होत. सेंट्रल फिंझबरीमधून ते निवडून गेले. ब्रिटिश संसदेत खासदार म्हणून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंदर्भात जे विचारमंथन केले ते अजोड आहे. देशसेवेची आणखी एक संधी त्यांना १८९७ मध्ये चालून आली. ‘रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्स्पेंडिचर’ हा आयोग नेमण्यात आला. सेल्बी हे इंग्रज गृहस्थ त्याचे अध्यक्ष होते. या आयोगावर सदस्य म्हणून दादाभाईंची नेमणूक झाली. इंटरनॅशनल सोशलिस्ट कॉंग्रेस ऊर्फ आंतरराष्ट्रीय समाजवादी महासभेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९०६ मध्ये कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी जहालांच्या अपेक्षा पुऱ्या केल्या. इंग्रजांवर जळजळीत टीका करताना ‘स्वराज्य’, ‘स्वदेशी’ आणि ‘बहिष्कार’ यांचा त्यांनी पुरस्कार केला. दादाभाईंचे आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे. म्हणूनच त्यांना ‘आधुनिक भारताचे पितामह’ म्हणतात.
१८४८ मध्ये दादाभाईंच्या पुढाकाराने पारशी व हिंदू धर्मातील युवा सुधारक एकत्र आले. त्यांनी ‘द स्टुडण्ट्स लिटररी अँड सायन्टिफिक सोसायटी’ची स्थापना केली. या सोसायटीचे उद्दिष्ट होते- अल्प वेतनावर काम करणाऱ्या किंवा पूर्णपणे सेवावृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांच्या सहकार्याने लोकांना शिक्षण देणे. संस्था सुरू झाल्याबरोबर विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चार पारशी वर्गासाठी ४४ विद्यार्थी मिळाले. तीन हिंदू वर्गासाठी २४ विद्यार्थी मिळाले. या सोसायटीला वर्ग चालविण्याकरिता आर्थिक अडचण येताच कामा कुटुंबाने देणगी देऊन तो प्रश्न सोडवला. एलफिन्स्टनमध्ये मुलींच्या शिक्षणाची सोय नव्हती. या कामाचा श्रीगणेशा सोसायटीने मुलींसाठी नऊ शाळा सुरू करून केला. यातूनच प्रेरणा घेऊन ‘अलेक्झांड्रा गर्ल्स नेटिव्ह एज्युकेशन इन्स्टिटय़ूशन’, ‘द पेटिट हायस्कूल फॉर गर्ल्स’, ‘द जमशेटजी जीजीभॉय स्कूल फॉर गर्ल्स’, ‘द कावसजी जहांगीर स्कूल फॉर गर्ल्स’ या शाळा निघाल्या.
दादाभाई अजरामर झाले ते ‘पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया’ या ग्रंथामुळे. इंग्रजी राज्याला दैवी वरदान समजण्याच्या कालखंडात आपल्या अवनतीला आणि शोषणाला ब्रिटिशच कसे जबाबदार आहेत, हे दादाभाईंनी या ग्रंथात दाखवून दिले. या ग्रंथात त्यांनी दारिद्रय, भारताचे राष्ट्रीय उत्पन्न, करनीती, भारताचे आर्थिक शोषण याबद्दल सविस्तर विवेचन केले आहे. त्यांनी हे दाखवून दिले की, वार्षिक उत्पन्न (दरडोई) वीस रुपये, तर राहणीचा वार्षिक खर्च ३४ (चौतीस) रुपये आहे. यामुळे भारतीयांना जीवनावश्यक गरजासुद्धा भागवता येत नाहीत. सैन्य, रेल्वे, ब्रिटिशांचे पगार, भत्ते यांवरच्या खर्चामुळे भारत मेटाकुटीला आला आहे. ब्रिटिश प्रशासन पद्धती अंतिमत: कशी सर्वानाच घातक आहे, हेही त्यांनी दाखवून दिले. भारतातील करांचा पैसा भारतात राहिला असता तर भारताचे एक वेळ भले झाले असते, परंतु हा कराचा पैसा इंग्लंडमध्ये नेल्याने जी अवस्था झाली, ती भीषण आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची आणि त्यामधील विविध विभागांच्या वाटय़ांची गणती करणारे ते पहिले भारतीय होत. ‘इंडियन इकॉनॉमिस्ट’ या समकालीन नियतकालिकावर त्यांनी आकडेवारीच्या अपूर्णतेसंदर्भात टीका केली. पुढे अर्थशास्त्रज्ञांनी दादाभाईंच्या मोजणी पद्धतीवर, प्रत्यक्ष शेती-उद्योगात व व्यवसायात किती माणसे गुंतली आहेत याचा विचार न करणे, देशाच्या एकूण उत्पादनातून विविध प्रकारच्या सेवांचे उत्पादन वगळणे यावर टीका केली. अर्थात, असे असले तरी ग्रंथातील हा अपुरेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उणेपणा आणत नाही.
भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाचा पाया घालणाऱ्या दादाभाईंचे ३० जून १९१७ रोजी निधन झाले. दादाभाईंच्या नवसारी येथील पुतळ्याचे अनावरण सयाजीराव महाराजांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, ‘दादाभाईंना त्यांच्या लक्षावधी देशबांधवांच्या अंत:करणात इतके उच्च व अढळ स्थान प्राप्त आहे, की राज-महाराजांनी त्यांचा हेवा करावा. त्या स्थानाची योग्यता इतकी श्रेष्ठ आहे, की त्यांची तुलना साधू-संतांशीच करता येईल. कोणत्याही देशात आढळणाऱ्या सर्वोच्च राष्ट्राभिमानाचा सवरेत्कृष्ट नमुना म्हणून दादाभाईंचा निर्देश करता येईल.’