धाराशिव : चोरीच्या गुन्ह्यात कडक कायदेशीर कारवाई न करता तक्रारदाराला मदत करून त्याच्याकडून बक्षीसापोटी पाच हजार रुपयांची लाच घेणार्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पंचासमक्ष पाच हजारांची लाच घेताना कळंब पोलीस ठाण्यातील रामचंद्र किसन बहुरे व त्याचा साथीदार पोलीस हवालदार महादेव तात्याराव मुंढे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. हेही वाचा - मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; RTE प्रवेशाबाबतचा ‘तो’ अध्यादेश रद्द करत राज्य सरकारला फटकारलं! हेही वाचा - “काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी चढली आहे, त्यांच्या…”; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांवर टीकास्र! सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येरमाळा गावानजीक उपळाई पाटी आहे. या ठिकाणी तक्रारदाराचे दिनेश नावाचे व्हेज-नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटसमोर काही दिवसांपूर्वी ३ शेळ्या व बोकड बेवारस अवस्थेत पोलिसांना आढळून आले. शेळ्या आणि बोकड तक्रारदाराच्या ताब्यात असताना पोलिसांनी त्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद न करता किरकोळ कारवाई करून त्याला दिलासा दिला. याप्रकरणात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक बहुरे आणि पोलीस हवालदार मुंढे यांनी ढाबा चालकास मदत केल्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांचे बक्षीस मागितले. पंचासमक्ष पाच हजार रुपयांची लाच बक्षीस रुपाने मागून ती स्वीकारल्याबद्दल शिकाऊ पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. वरील दोघांच्या विरोधात कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आले आहे.