राज्यात सत्तांतराचं घमासान सुरू असतानाच नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी स्वीय साहाय्यकावर (पीए) गंभीर आरोप झाले आहेत. “बंडखोर आमदारांना विरोध का करता? विरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू,” अशी धमकी एकनाथ शिंदे यांच्या पीएने दिल्याचा आरोप जळगाव शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला आहे. जळगाव शिवसेनेने बंडखोर आमदारांच्या विरोधात शनिवारी (२ जुलै) मोर्चा काढला. यावेळी सभेदरम्यानच हा फोन आल्याचं गुलाबराव पाटलांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगावमध्ये बंडखोर आमदारांविरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी गुलाबराव वाघ यांना एक फोन आला. “फोनवर बोलणाऱ्याने मी एकनाथ शिंदे यांचा पीए बोलत आहे असं सांगितलं. आमदारांना विरोध का करता? असा सवाल करत त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली,” असा आरोप गुलाबराव वाघ यांनी केला. विशेष म्हणजे हा फोन सभेदरम्यानच आला होता. वाघ यांनी ज्या फोनवरून धमकी आली तो नंबरही माध्यमांना दाखवला.

धमकीच्या फोनवर गुलाबराव वाघांची प्रतिक्रिया

धमकीच्या फोनवर प्रतिक्रिया देताना गुलाबराव वाघ यांनी आपण अशा धमक्यांना भीक घालत नसल्याचं वक्तव्य केलं. ते म्हणाले, “मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. बंडखोरांविरोधात शिवसैनिक एकवटला आहे. शिवसैनिकांची एकजुट अशीच राहील. आम्ही यापुढेही बंडखोरांचा विरोध करू.” शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी शिवसैनिकांना हात जरी लागला तर जशास तसं उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

धमकीविरोधात पोलीस तक्रार करणार

गुलाबराव वाघ यांनी धमकीच्या फोनची माहिती देतानाच याविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार असल्याचंही सांगितलं.

दरम्यान, जळगावमधून गुलाबराव पाटलांसह इतर आमदार शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. याविरोधातच जळगावमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allegations of threat to gulabrao wagh by eknath shinde pa in jalgaon pbs
First published on: 03-07-2022 at 11:43 IST