लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वासमोर ठेवला होता. मात्र, भाजपाच्या नेतृत्वाने या प्रस्तावावर अद्यापही निर्णय घेतलेला नाही. आज होणाऱ्या भाजपाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावर आता शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा?” ‘त्या’ विधानावरून अनिल देशमुखांचा सवाल!

अनिल देशमुख यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, भाजपाच्या नेतृत्वाने देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घेऊ नये, विधानसभेपर्यंत तरी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदी कायम ठेवावं, जेणेकरून महाविकास आघाडीचा फायदा होईल, अशा खोचक शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले अनिल देशमुख?

“भाजपाच्या नेतृत्वाला माझी हात जोडून विनंती आहे, की त्यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कायम ठेवावं. त्यांचा राजीनामा मान्य करू नये, विधानसभा निवडणूक होईपर्यंत ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले पाहिजे”, असं अनिल देशमुख म्हणाले. तसेच “जे जितके दिवस उपमुख्यमंत्री म्हणून राहतील, तेवढा महाविकास आघाडीला राज्यात फायदा होईल”, अशी खोचक प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – “माजी गृहमंत्र्याचा अभ्यास कायद्याचा नसून केवळ १०० कोटींच्या वसुलीचा, त्यामुळे…”; अनिल देशमुखांच्या ‘त्या’ आरोपाला भाजपाचं प्रत्युत्तर!

देवेंद्र फडणवीसांनी दिला राजीनाम्याचा प्रस्ताव

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला अपेक्षित यश न मिळाल्याने या पराभवाची नैतिक जबाबदारी घेत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. सरकारमधून मुक्त केले तर राज्यभर फिरून संघटना मजबूत करण्याचे काम करेन असे फडणवीस यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे स्पष्ट केले होते. ही भूमिका फडणवीस यांनी अमित शहा यांच्याकडेही मांडली होती. मात्र, अमित शाहांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदी कायम राहण्याचे निर्देश दिले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil deshmukh on devendra fadnavis propose resign as dcm after loksabha election result spb