एकीकडे राज्यात मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं केलेल्या कारवाईची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एका विधानावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी श्रीधर पाटणकरांवर झालेल्या कारवाईनंतर खळबळजनक वक्तव्य केलं. “माझ्या मुलीला इथे नुसतं बोलवलं तरी ती आत्महत्या करेल”, असं आव्हाड म्हणाल्यानंतर त्यावर आता आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, आदित्य ठाकरेंना देखील त्यांनी जाब विचारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक वक्तव्य!

जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना हे विधान केलं आहे. “माणसाला भीती खात असते. रात्री ३ वाजता टकटक झालं, तर हार्ट अटॅक येण्याचीच शक्यता असते. ध्यानी-मनी-स्वप्नीच नसतं कुणाच्या घरात कोण घुसेल हे… यात सर्वात हाल होतात ते अशा माणसांचे ज्यांचा तुमच्या राजकारणाशी संबंध नसतो. माझ्या मुलीचा राजकारणाशी संबंध काय? पण तिला जर उद्या नुसतं बोलवलं, तरी ती आत्महत्या करेल. ते फ्री बर्ड्स आहेत. त्यांना या असल्या सवयी नाहीयेत”, असा आव्हाड म्हणाले आहेत. तसेच, “मला वाटतं की तिने या देशात राहू नये”, असं देखील आव्हाड म्हणाले.

“भाजपाचे सगळे रस्त्यावर भीक…”, संजय राऊतांनी साधला निशाणा, श्रीधर पाटणकरांवरच्या कारवाईनंतर दिली प्रतिक्रिया!

“आदित्य ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी”

दरम्यान, आव्हाडांच्या या विधानानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आव्हाडांच्या विधानावरून थेट आदित्य ठाकरेंना जाब विचारला आहे. “स्वत: मंत्री पदावर बसलेली व्यक्ती महाराष्ट्राबद्दल असं गंभीर वक्तव्य करत असेल आणि जगभरात आणि देशभरात महाराष्ट्र हे बिकट परिस्थितीत चाललेलं राज्य आहे असा प्रचार करत आहेत, तर हा महाराष्ट्र द्रोह नाही तर काय आहे? यावर आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

“यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत, त्यांना कायमचं…”, संजय राऊतांनी डागली भाजपावर तोफ!

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई!

उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या ११ सदनिका ईडीनं जप्त केल्या आहेत. ठाण्यातल्या वर्तकनगर या उच्चभ्रू भागात असलेल्या निलांबरी अपार्टमेंट्समध्ये या ११ सदनिका आहेत. हा साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. चा प्रकल्प असून त्यावरून वाद सुरू झाला आहे. काळा पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाकडे वळवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. यातून ही कारवाई करण्यात आली. मात्र, त्यातून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish shelar targets aaditya thackeray on jitendra awhad statement on daughter pmw