भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच आपण अजित पवारांबरोबर शपथविधी घेतला होता, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. शरद पवारांचं राजकारण गद्दारीशिवाय आणि पाठीत खंजीर खुपसल्याशिवाय पूर्ण होत नाही, अशी टीका पडळकर यांनी केली. ते धुळे येथे कोळी समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पवारांवर हल्लाबोल केला.

हेही वाचा- “काही नॉटी मुलं…”, फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सुप्रिया सुळेंची टोलेबाजी!

देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “शरद पवारांचा चेहरा आधीच गद्दारीने काळवंडला होता. आता देवेंद्र फडणवीसांनी एकच वाक्य सांगितलं आणि पवारांचा चेहरा डांबरासारखा काळा झाला आहे. ते फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर निरुत्तरित आहेत. ते या विषयात काहीच बोलू शकत नाहीत. त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी मागच्या पंधरा दिवसांत सांगितलं होतं की, हे शरद पवारांच्या सांगण्यावरून झालं. म्हणजेच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं की, शरद पवारांचं राजकारण गद्दारीशिवाय आणि पाठीत खंजीर खुपसल्याशिवाय पूर्ण होत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader gopichand padalkar on sharad pawar politics devendra fadnavis claim rmm