एखादा विद्यार्थी ‘ढ’ असल्याने सारखा नापासच होत असेल, तर किमान शेजारच्याचं पाहून तरी पास झालं पाहिजे : खासदार प्रीतम मुंडे

भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मध्य प्रदेशचं उदाहरण देत महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Pritam Munde 2
प्रीतम मुंडे (संग्रहित छायाचित्र)

भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मध्य प्रदेशचं उदाहरण देत महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. जे मध्य प्रदेशला जमले ते महाराष्ट्र सरकारला का जमत नाही? असा सवाल प्रीतम मुंडे यांनी उपस्थित केला आहे. “एखादा विद्यार्थी सारखा नापास होत असेल तर शेजाऱ्याचं पाहून कॉपी करून तरी पास झालं पाहिजे,” असं म्हणत खासदार मुंडे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. त्या बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

प्रीतम मुंडे म्हणाल्या, “मध्य प्रदेशचा ओबीसी आरक्षणावरील निर्णय येईपर्यंत भाजपा बॅकफुटवर होती हे निरीक्षण मुळात मला मान्य नाही. भाजपाने राज्यव्यापी आंदोलनं केली आहेत. वेळोवेळी आम्ही हा विषय उचलत आहोत. परंतु दुर्दैवाने राज्य सरकारने जो डेटा सादर करणं अपेक्षित आहे, ते जर राज्य सरकार करत नसतील तर त्यात आम्ही काय करू शकतो. केंद्र सरकार तर यात काहीच हस्तक्षेप नाही.”

“राज्य सरकार त्यांनी करायची कामं करणार नसतील, तर…”

“राज्य सरकार त्यांनी करायची कामं करणार नसतील आणि दुर्दैवाने निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या तर भाजपाच्या हातात भाजपाशासित राज्यात ओबीसींना न्याय देणं एवढंच उरतं. मध्य प्रदेशने ही लढाई जिंकलीय त्यामुळे मध्य प्रदेश उदाहरण घालून देणारं राज्य ठरलंय. त्याचा आदर्श इतरांनी घ्यावा,” असं प्रीतम मुंडे यांनी सांगितलं.

“एखादा विद्यार्थी इतका ‘ढ’ असेल की नापासच होतोय, तर किमान कॉपी करून पास व्हावं”

“मी एमडीपर्यंत शिक्षण घेतलं, पण माझ्या आयुष्यात मी कधीही कॉपी केलेली नाही. मी कॉपी करण्याचं समर्थनही करत नाही, पण एखादा विद्यार्थी इतका ‘ढ’ असेल की नापासच होतोय, तर त्याने निदान शेजारच्याचं पाहून पास होण्याएवढे तरी गुण मिळवावे अशी आज वास्तववादी अपेक्षा राज्य सरकारकडून आहे,” असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला टोला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mp preetam munde criticize mva government over obc reservation issue in beed pbs

Next Story
“राज ठाकरे कधीही अयोध्येला गेले, तरी…”, बृजभूषण सिंह यांच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भाजपाची भूमिका!
फोटो गॅलरी