अपक्ष आमदार तथा काँग्रेसचे माजी नेते सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मला चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. तांबे कुटुंबीय तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची बदनामी करण्यासाठी कट रचला गेला. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठी मोठे षडयंत्र रचले गेले, असा खळबळजनक दावा सत्यजीत तांबे यांनी केला आहे. तांबे यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस पक्षातील याच अंतर्गत वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. शरद पवार यांनी निवडणुकीपुर्वीच नाशिकच्या जागेवरील तिढा काँग्रेसने मिटवावा असे सूचलवे होते, असे भुजबळ म्हणाले आहेत. ते आज (५ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी दीपक केसरकरांचे शरद पवारांना आवाहन, म्हणाले “पवारसाहेब सर्वांचेच…”

शरद पवार यांनी निवडणुकीच्या अगोदच सांगितले होते की…

“काँग्रेसमध्ये नेमकं काय घडलं, हे समजायला मार्ग नाही. अगदी ऐनवेळी जे झाले ते फारच विचित्र झाले. यामध्ये कोण दोषी याचा अद्याप उलगडा झालेला नाही. शरद पवार यांनी निवडणुकीच्या अगोदच फॉर्म भरताना सांगितले होते की काँग्रेसने या सर्व बाबीचा विचार केला पाहिजे. काँग्रेसने एकत्र बसून हा प्रश्न सोडवला पाहिजे. मात्र हा प्रश्न त्यावेळी सुटला नाही. मग साहजिकच निवडणूक बिनविरोध होते की काय असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मग महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना उभे केले. वेळ फार कमी होता. मात्र शुभांगी पाटील यांनी ४० हजार मतं मिळवली,” असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा >>> कथित हेरगिरी करणाऱ्या चीनच्या ‘बलून’ला हवेतच केले नष्ट, कारवाईसाठी अमेरिकेची विशेष मोहीम!

मी ५६ ते ५७ वर्षे राजकारणात आहे, पण…

“तांबे यांनी मतदारनोंदणी मोठ्या प्रमाणात केली. ते आता निवडून आले आहेत. ते अजूनही सांगत आहेत की मी अपक्ष आहे. काँग्रेसने मला चुकीचे एबी फॉर्म दिले होते, असे ते सांगतात. मी ५६ ते ५७ वर्षे राजकारणात आहे. मी अनेक निवडणुका लढवल्या. पण अशा प्रकारे कोणी एबी फॉर्म देतं आणि ते घेताना कोणीही पाहात नाही, असं कधी होत नाही. मतदारसंघ कोणता आहे. नाव बरोबर आहे का? या सर्व बाबी तपासल्या जातात. मात्र सत्यजीत तांबे यांच्या बाबतीत नेमके काय घडले? यावरच वाद-प्रतिवाद सुरू आहे. काँग्रेसने काय ते पाहावे. त्यात लवकरच स्पष्टता येईल,” असेही छगन म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal comment on satyajeet tambe allegations on congress and nana patole prd
First published on: 05-02-2023 at 13:17 IST