लातूर : लातूरची शिकवणी बाजारपेठ ही दर वर्षी वाढते आहे. मात्र, त्यात जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यात टिकून राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दलाल घुसले आहेत. दलालामार्फत अधिकाधिक विद्यार्थी आपल्याकडे यावेत यासाठी शिकवणीचालक प्रयत्न करतात. याचबरोबर वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठीही दलालांचा वापर होतो. शिकवणीवर्गात विद्यार्थी आणल्यानंतर शिकवणीच्या शुल्काच्या तीन ते पाच टक्के आणि प्राध्यापकांची फोडाफोडी केली, तर प्राध्यापकांच्या वेतनाएवढे कमिशन दिले जात आहे.

स्पर्धा इतकी टोकाला गेली आहे, की शिकवणी वर्गात व शहरातील नामवंत महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकांना खेचून घेण्यासाठीही दलाल पेरले गेले आहेत. त्यासाठी मोठ्या रकमा दिल्या जातात. शेअर मार्केटमध्ये जशी चढ-उतार असते तशीच अवस्था शिकवणी वर्गातही निर्माण होत आहे.

हेही वाचा >>> अकलूजमध्ये भरधाव मोटार झाडांसह दगडावर आदळून दोन तरूणांचा जागीच मृत्यू

चांगले चाललेले शिकवणी वर्ग अचानक दोन वर्षांत बंद होतात, तर बंद पडतील अशी भीती वाटणारे शिकवणी वर्ग वेगाने वाढतात. कोणाची गत कधी कशी होईल, हे सांगता येत नाही अशी स्थिती शिकवणी बाजारपेठेत निर्माण झाली आहे. दर वर्षी आपली गुणवत्ता टिकून राहिली पाहिजे, किमान ती कागदावर दिसली पाहिजे, तरच नवीन विद्यार्थ्यांचा ओढा आपल्याकडे राहील यासाठी नीट परीक्षेत व जेईई परीक्षेत सर्वाधिक गुण घेणारे विद्यार्थी आपल्या शिकवणी वर्गाचे आहेत हे जाहिरातीत दाखवता यावे, त्यांचे फोटो छापता यावेत यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी शिकवणीचालकाची असते.

विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांच्या प्रवेशाच्या मागील तारखेत कागदपत्र तयार करून घेऊन छायाचित्रे छापली जातात. ७२० पैकी ७०० पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार असतोच; शिवाय शिकवणीचालकांकडे छायाचित्र छापायला दिले यासाठीही त्यांना पैसे मिळतात. एखाद्या शिकवणी वर्गाकडे ७०० पेक्षा अधिक गुण घेणारे जास्त विद्यार्थी असतील, तर त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक जाईल यासाठी आपल्याही शिकवणीच्या जाहिरातीत अधिक विद्यार्थी असल्याचे सिद्ध करण्याची धडपड सुरू झाली आहे. यासाठीही दलाल कार्यरत असतात.

निकोप स्पर्धेची अपेक्षा

सहा वर्षांपूर्वी अविनाश चव्हाण या शिकवणीचालकाचा खून झाला होता. आपापसातील स्पर्धेमुळे टोकाचे पाऊल उचलले गेले. त्यामुळे शिकवणी क्षेत्र हादरले होते. त्यानंतर काही काळ शांतता होती. आता पुन्हा नव्याने जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे.