दोन दिवसांपूर्वीच राज्यात नव्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटलांकडून काढून अजित पवार यांना देण्यात आलं आहे. त्याव्यतिरिक्त इतर ११ पालकमंत्र्यांचीही घोषणा करण्यात आली. मात्र, दुसरीकडे अजित पवार आजारी असल्याची माहिती समोर आली. अजित पवारांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी काही कार्यक्रमांना जाणंही रद्द केलं होतं. काही नेतेमंडळी अजित पवारांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरीही जाऊन आली. मात्र, अजित पवार आजारी नसून नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यासंदर्भात आता कांग्रेसचे आमदार व विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक टीका केली आहे.
शिंदे गटाच्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणारच, असा विश्वास वडेट्टीवार यांनी यावेली व्यक्त केला. “या १६ आमदारांवर कारवाई होणारच आहे. आजचं मरण उद्यावर एवढाच वेळकाढूपणा चालला आहे. जर त्यांच्यावर कारवाई होण्याचा प्रश्न नसता, तर ते प्रकरण इतकं लांबवण्याची गरज पडली नसती. पण त्यांना अपात्र करण्याच्या कारवाईतून आता कुणी सुटू शकत नाही”, असं वडेट्टीवार म्हणाले.
“दाग बडे जिद्दी है, जाते ही नहीं”
“कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या ९ मंत्र्यांना काढण्याची तयारी चालू झाली आहे. त्यांना घरी जावंच लागेल. त्यांनी या सगळ्यांना शुद्ध करून घेण्याचा प्रयत्न केला. गोमूत्र शिंपडून पाहिलं, शुद्ध झाले नाहीत. वॉशिंग मशिनमध्ये टाकून पाहिलं. तरी ते स्वच्छ झाले नाहीत. ते म्हणतात, ये दाग बडे जिद्दी है.. निकलते ही नहीं.. अशी स्थिती या मंत्र्यांची झाली आहे. त्यांना काढण्याशिवाय पर्याय नाही. कारण त्या मंत्र्यांविरोधातल्या तक्रारी भाजपाच्याच लोकांनी केलेल्या आहेत”, असंही वडेट्टीवार यांनी यावेळी नमूद केलं.
“जर सरकारमध्ये प्रामाणिकपणाची जाणीव असेल, तर…”
“जर कुणी मंत्री शेतकऱ्यांना लुटत असेल, तर शेतकऱ्यांशी खेळ करणाऱ्या असा मंत्र्याला पदावर राहायचा अधिकार आहे का? हे आम्ही नाही, पीएमएलए न्यायालय विचारत आहे. जर सरकारमध्ये थोडी जरी प्रामाणिकपणाची जाणीव असेल तर त्यांनी तातडीने हसन मुश्रीफांचा राजीनामा घ्यायला हवा”, असंही वडेट्टीवार म्हणाले.
“अजित पवार नेहमीच नाराज असतात”
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “अजित पवार तर नेहमीच नाराज असतात. त्यांच्या पद्धतीने काही काम झालं नाही तर ते असं करतात. त्यांची ती पद्धत आहे. नेहमी नाराज राहायचं आणि आपलं वर्चस्व तयार करायचं. हे नेहमीचं आहे. आमच्या मंत्रीमंडळातही त्यांनी हेच केलं. कधी ते नाराज होतात, कधी मोबाईल बंद ठेवतात. कधी नॉट रीचेबल होतात. कधी ताप होतो. आजकाल त्यांना जास्त त्रास होऊ लागलाय, त्यामुळे हे राजकीय आजार त्यांना होऊ लागले आहेत असं मला वाटतंय”, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.