“उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटले आणि त्यांच्या भूमिकेत…”; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

काही सल्लागार आणि अतिउत्साही मंडळी जे काही करतात त्यामुळे पक्ष अडचणीमध्ये आला आहे, असेही केसरकर म्हणाले

uddhav thackeray sharad pawar
दीपक केसरकरांनी शरद पवारांबाबत प्रतिक्रिया दिली आहे

शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली असून, हा वाद आता सुप्रीम कोर्टात गेला आहे. १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या दोन याचिकांवर न्या. सूर्यकांत व न्या. जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. याबाबत बोलताना शिवसेना बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

“आमची बाजू खरी आहे. न्यायदेवतेकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. कारण जो न्याय आम्हाला महाराष्ट्राकडून मिळाला नाही तो न्यायदेवतेकडून मिळेल. हा महत्त्वाचा निकाल असणार आहे. ज्यांच्याकडे बहुमत असते त्यांचा स्वीकार करावाच लागतो. लोकप्रतिनिधींना त्यांचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असतो. त्यांचा तो अधिकार काढून घेतला जाता कामा नये. आम्ही मूळ पक्षावर दावा करत नाही. असा गैरसमज घडवून महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणल्या जात आहेत. पक्षातील २० टक्के लोक बैठक घेऊन ठराव करतात. बैठक झाली त्यावेळी मी तिथे होतो. पण आपण सांगितले तसेच करायचे आणि मग अडचणीमध्ये यायचे असे शिवसेनेमध्ये घडत आहे. यामुळे पक्षप्रमुख आणि सगळेच लोक अडचणीमध्ये येतात. त्यांनी चांगले सल्लागार सोबत घेतले पाहिजेत. काही लोक शांत स्वभावाचे आहेत पण त्यांचे किती ऐकले जाते हे मी सांगू शकणार नाही आणि वरिष्ठांबद्दल बोलणे हा माझा स्वभाव नाही. ही परिस्थिती काही सल्लागार आणि अतिउत्साही मंडळी जे काही करत असतात त्यामुळे पक्ष अडचणीमध्ये आला आहे,” असे दीपक केसरकर यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात ; एकनाथ शिंदे गटाच्या दोन याचिकांवर आज सुनावणी

संजय राऊतांनी आमच्या मतांवर राज्यसभेवर जाऊ नये

“संजय राऊतांच्या वक्तव्यावर संतप्त अशी प्रतिक्रिया सर्व आमदारांची होती. आम्हाला तुम्ही प्रेत म्हणत असाल तर आमच्या मतांवर राज्यसभेवर जाऊ नका. राजीनामा द्या पुन्हा निवडून या आणि सन्मानाने चाला. कारण बाळासाहेबांनी जो सन्मान शिकवला तो तुम्ही संपवला. बाळासाहेब असते तर त्यांनी राज्यसभेच्या पदाला लाथ मारायला सांगितली असती,” असा टोला केसरकर यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मागच्या दाराने सत्तेत आले – दीपक केसरकर

“काल पर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आपल्या लोकांना जवळ घेण्याची होती. पण त्यानंतर ते शरद पवारांना भेटले आणि त्यांच्या भूमिकेत बदल झाला. त्यामुळे लोकशाहीमध्ये लोकांसमोर जाऊन विचार मांडावे लागतात. शिवसेना आणि भाजपा एकत्र येण्याचा विचार आम्ही मांडला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पराभूत केले. पण आता तेच लोक मागच्या मार्गाने सत्तेमध्ये आले आहेत. शिवसेना आणि भाजपाची २५ वर्षांची युती तुटलेली आहे. महाराष्ट्र जाळण्याचे काम असेच सुरु राहिले तर मला या गोष्टी उघड कराव्या लागतील,” असेही दीपक केसरकर म्हणाले.

विश्लेषण : सरकारचे भवितव्य ठरते विधानसभेतच… काय सांगतो सर्वोच्च न्यायालयाचा बोम्मई निकाल?

“आमचा पराभव होऊ शकत नाही. त्यामुळे शरद पवारांच्या सल्लानुसार वेळ मारून नेण्यासाठी ही लढाई आहे. पक्षात फूट पाडता येते का हा प्रयत्न आहे आणि तो यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही सर्व एकत्र आहोत. संजय राऊत जेवढी वाईट वक्तव्ये करणार तेवढी आमची एकी मजबूत होणार हे त्यांनी लक्षात ठेवावे,” असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deepak kesarkar reaction to the supreme court hearing abn

Next Story
Maharashtra Political Crisis: …अन् शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यापासून थांबवलं
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी