नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व ओबीसी समाजाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शहर भाजप व ओबीसी आघाडीने आज, सोमवारी शहरातील दिल्लीगेट भागात राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ास जोडे मारून त्याचे दहन करण्याचे आंदोलन केले. या वेळी राहुल गांधी व काँग्रेसच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या वेळी बोलताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे म्हणाले, की काँग्रेसचे राहुल गांधी यांनी कितीही आटापिटा केला तरी त्यांना जनाधार मिळत नाही. म्हणूनच ते सतत बेताल व वादग्रस्त वक्तव्य करत प्रसारमाध्यमांची नजर आपल्याकडे वळवत आहेत. पंतप्रधान मोदी व भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांवर खालच्या पातळीवर आरोप करत आहेत. ओबीसी जातींबद्दल द्वेष करत आहेत. असे गलिच्छ राजकारण भाजप सहन न करता त्यास प्रत्युत्तर देईल. गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातून काँग्रेसचे उच्चाटन झाले आहे. त्यांची स्वत:ची खासदारकी त्यांनी गमावली आहे. त्यामुळे आतातरी राहुल गांधी यांनी स्वत:ला बदलावे.
या वेळी आंदोलनात ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, पदाधिकारी ज्ञानेश्वर काळे, संतोष गांधी, वसंत राठोड, विजय काळे, रवींद्र बारस्कर, सचिन पावले, सुमित इपलपेल्ली, गोकुळ काळे, अनिल गट्टाणी, बाळासाहेब गायकवाड, अजय चितळे, सुमित बटुळे, रेखा विधाते, लीला अग्रवाल, किशोर कटोरे, राजू मंगलारप, महावीर कांकरिया, संजय ढोणे, किशोर रायमोकर, नितीन पडले आदी सहभागी झाले होते.