गुणरत्न सदावर्तेंना आज(सोमवार) सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मराठा आरक्षण प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका असलेल्या सदावर्तेंना चार दिवसांपूर्वीच न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली होती, त्याची मुदत आज संपल्यानं शहर पोलिसांनी सदावर्तेंना सातारा न्यायालयात हजर केलं होतं आणि त्यानंतर तपासाच्या दृष्टीनं सातारा पोलिसांनी न्यायालयात पोलीस कोठडीची मागणी केली होती. यावर न्यायालयाने निर्णय जाहीर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन वर्षांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी एका खासगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना निर्माण झाली होती. दरम्यान, सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र, ते गैरहजर राहिल्यानं सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणात ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला होता. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर बीडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी आणखी दहा दिवस पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. परंतु, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणीही सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे साताऱ्यातून कोल्हापूर की पुणे पोलीस त्यांना ताब्यात घेणार याची उत्सुकता होती. परंतु, सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक भगवान निंबाळकर म्हणाले की, त्यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड कारागृहात होणार आहे. तेथूनच पुढे कोणाच्या ताब्यात दिले जाईल, हे स्पष्ट होणार आहे. सातारा शहर पोलिसांनी गुणरत्न सदावर्तेंना मुंबईतील आर्थररोड जेलकडे हलवले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gunaratna sadavarte remanded in judicial custody for 14 days decision of satara district and sessions court msr