जळगाव : तीन वेळा निश्चित होऊनही रद्द झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून ते १२ सप्टेंबरला जिल्ह्यात येणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे हे मंगळवारी दुपारी बारा वाजता शासकीय विमानाने मुंबई येथून जळगाव विमानतळावर येतील आणि हेलिकॉप्टरने ते पाचोरा तालुक्यातील हडसन शिवारातील हेलिपॅडवर दुपारी १२.१५ वाजता उतरतील. तेथून मोटारीने पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थित राहतील.
हेही वाचा : Video : नाचता नाचता गौतमी पाटीलचा पाय लचकला अन्…, दहिहंडी कार्यक्रमात तरुणांच्या काळजाचा ठोकाच चुकला!
दुपारी अडीचला मोटारीने निघून नांद्रा (ता. पाचोरा) येथे दुपारी २.५० वाजता नर्मदा ग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट कंपनीचे उद्घाटन, नगरदेवळा रेल्वेस्थानकानजीक निंभोरा (ता. भडगाव) येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे भूमिपूजन आणि पाचोरा येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन मुख्य इमारत बांधकामाचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होईल. दुपारी साडेतीनला मोटारीने हडसन शिवारातील हेलिपॅडकडे रवाना होतील. तेथून दुपारी पावणेचारला हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे रवाना होतील आणि तेथून दुपारी चारला ते शासकीय विमानाने मुंबईकडे रवाना होतील.