सांगली : सांगली-तासगाव या वर्दळीच्या मार्गावरील रेल्वे उड्डाण पूलाचे काम रखडल्यामुळे सोमवारी या कामाचे वर्षश्राध्द घालून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. विधीवत पूजा करून या ठिकाणी रेल्वेच्या दिरंगाईच्या कामाबद्दल भोजनही घालण्यात आले.

सांगली-तासगाव मार्गावर रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी आणि वाहतूक जलदगतीने व्हावी यासाठी रेल्वेकडून उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या कामासाठी या मार्गावरून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असली तरी अत्यंत गैरसोयीची आहे. एक वर्ष या पूलाचे काम रखडल्याबद्दल नागरीक जागृती मंचच्यावतीने आज वर्ष श्राध्द घालण्यात आले.

हेही वाचा : मुरलीधर मोहोळांचा सुप्रिया सुळेंना टोला, “सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांची मळमळ…”

या पूलाच्या कामासाठी प्रारंभी सहा महिन्याची मुदत ठेकेदाराला देण्यात आली होती. ही मुदत ३१ जानेवारी रोजी समाप्त झाली. यानंतर सहा महिने मुदतवाढ देउनही या पूलाचे काम अपूर्ण आहे. सांगली शहराला जोडणारा आटपाडी, विटा, खानापूर, तासगाव, तालुक्याना जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. यामुळे या पूलाचे काम लवकरात लवकर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही काम रखडले आहे. यामुळे आज सदर पूलाचे वर्षश्राध्द घालून आंदोलन करण्यात आल्याचे सतीश साखळकर यांनी सांगितले. या निमित्ताने पूलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पिंडदान विधी करून सुमारे २०० लोकांना श्राध्दाचा प्रसाद म्हणून भोजन देण्यात आले. या पूलाचे काम जुलैअखेर न झाल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

हेही वाचा : सांगली: चार शतकांचा साक्षीदार असणारा वटवृक्ष कोसळला

यावेळी भाजपच्या नेत्या नीता केळकर, शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, मनोज सरगर, माधवनगरचे सरपंच अंजू तोरो, सांगली जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे बाळासाहेब कलशेट्टी, कुपवाड व्यापारी असोसिएशनचे अनिल कुमठेकर,अशोक गोसावी आदी या सहभागी झाले होते.