राज्यात गेल्या महिन्याभरापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर आता राज्य सरकार व त्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या फेऱ्या होत आहेत. राज्य सरकारकडून जरांगे-पाटील यांच्याकडे महिन्याभराचा अवधी मागण्यात आला आहे. एकीकडे मराठा आरक्षणावरून राजकारण तापलेलं असताना दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारच्या एका कंत्राटावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

अजित पवार गटावर आगपाखड

जितेंद्र आव्हाडांनी यावेळी कोल्हापूरमध्ये झालेल्या अजित पवार गटाच्या सभेवर आगपाखड केली. “परवाच्या सभेत एक शायरी कोल्हापुरात म्हणण्यात आली. ती अशी होती…मेरी कोई खता तो साबित कर, जो बुरा हूँ तो बुरा साबित कर… तुझे चाहा है इतना, तू क्या जाने, मै बेवफाही सही, तू अपनी वफा तो साबित कर…शरद पवारांना आव्हान दिलंय की तुम्ही इमानदार आहात हे सिद्ध करा. या नेत्यांना शायरी किती समजते माहिती नाही. तुम्ही शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला सांगण्याची तुमची लायकी आहे का?” असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.

‘त्या’ जीआरवरून टीकास्र

दरम्यान, यावेळी पत्रकारांनी राज्य सरकारकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कंत्राटासंदर्भात काढण्यात आलेल्या एका जीआरसंदर्भात विचारणा करताच जितेंद्र आव्हाड संतप्त झाले. “कसलं आरक्षण मागताय तुम्ही? ७० हजार की एक लाख लोक खासगी कंपनीच्या माध्यमातून भरले आहेत. म्हणजे आरक्षण नाही. मग कसल्या आरक्षणासाठी मारामाऱ्या करताय तुम्ही?” असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला.

“हे सरकार आरक्षणाच्या विरोधात आहे. गरिबांनी हक्कानं नोकरी मिळवावी याच्याविरोधात आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना तर आरक्षण मिळालंच पाहिजे. कंत्राटावर येणारे सफाई कामगार उच्चवर्णीयांमधून येतात का? तेच बिचारे गरीब, मागासवर्गीय, शूद्र गटारी साफ करायला येतात ना? भारताच्या इतिहासात आजपर्यंत कोण उच्चवर्णीय गटारात उतरलाय? ही वर्णव्यवस्था जाणं अवघड आहे. ती वाढवली जाईल”, असं आव्हाड यावेळी म्हणाले.

“ओबीसींना राजकीय आरक्षण नको म्हणून भाजपाचे पदाधिकारी कोर्टात गेले”, रोहित पवारांचा दावा…

“आज सरकारकडून शिक्षणाच्या सवलती दिल्या जात नाहीत. खासगी शाळेची फी परवडते का? मागासवर्गीय घरातली मुलं पुढे शिकणारच नाहीयेत. त्यामुळे नव्याने वर्गव्यवस्था निर्माण होईल. वर्णव्यवस्था तर आहेच. आणि त्याला हे सरकार जबाबदार असेल”, असं त्यांनी नमूद केलं.

इंडिया शब्दावरील राजकारणावरून टीका

सत्ताधारी भाजपाकडून विरोधकांच्या आघाडीसाठी वापरण्यात आलेल्या इंडिया शब्दावर आक्षेप घेत देशाचा उल्लेख ‘भारत’ असा करण्यावर भर दिला जात आहे. यावरून आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे. “इंडिया शब्द काढायला तुम्हाला संविधान बदलावं लागेल. यावर तेव्हा सखोल चर्चा झाली आहे. हे शब्द कसे आणायचे याबाबतच्या आक्षेपांवर चर्चा करून त्यानंतर एकमताने संविधानावर सह्या करण्यात आल्या. संविधानाच्या कलम १ मध्ये ‘इंडिया, दॅट इज भारत’ असं लिहिलं आहे. त्यामुळे हे बदलण्यासाठी तुम्हाला संविधान बदलावं लागेल. जर संविधान बदललं तर हा देश पेटेल”, असा इशारा आव्हाडांनी सरकारला दिला.

Live Updates