Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : “आगामी विधानसभा निवडणुकीत मला मतरुपी आशीर्वाद न दिल्यास, लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये खात्यातून काढून घेईन”, असं विधान आमदार रवी राणा यांनी सोमवारी अमरावतीत एका कार्यक्रमात बोलत केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी संताप व्यक्त केल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रवी राणांवर नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, अशा वक्तव्यांमुळे सरकारची बदनामी होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
अजित पवार म्हणाले, “कोणत्यातरी लोकप्रतिनिधीने सांगितलं की हे १५०० रुपये परत घेणार. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो की हे पैसे परत घेण्याकरता नाहीत, तुमच्याकरता दिलेले आहेत. कधीतरी वेगळ्या पद्धतीने वक्तव्य करतात, मग त्यातून पेपरबाजी केली जाते. बातम्या होतात. त्यातून नाहक महायुतीच्या सरकारची बदनामी होते.”
हेही वाचा >> “…तर १५०० परत घेऊ”, रवी राणांच्या विधानावर आदिती तटकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “महायुतीच्या सरकारने…”
रवी राणांनी नेमकं काय म्हटलं होतं?
आमदार रवी राणा यांनी सोमवारी लाडकी बहीण योजनेबाबत एक विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. “सरकारने महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिवाळीनंतर ही रक्कम वाढवून तीन हजार रुपये केली पाहिजे. आज सरकारने तुम्हाला १५०० रुपये दिले आहेत. उद्या तुमचा भाऊ म्हणून मी ही रक्कम तीन हजार करण्याची विनंती सरकारकडे केली, तर तुम्हाला तीन हजार मिळू शकतात. पण ते तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही मला तुमचा भाऊ म्हणून मतरुपी आशीर्वाद द्याल. पण जर तुम्ही या निवडणुकीत मला आशीर्वाद दिला नाही, तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन”, असं आमदार रवी राणा म्हणाले होते.
आदिती तटकरेंचाही संताप
“रवी राणांनी केलेलं विधान दुर्दैवी आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचं विधान करणं चुकीचं आहे. महायुतीच्या सरकारनं ही जी योजना आणली आहे, ती गरीब महिलांच्या सन्मानासाठी आहे. त्या महिलांकडून पैसे परत घेण्याचा असा कोणताही विचार सरकार करत नाही. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, हा आमचा उद्देश आहे, त्यामुळे अशा प्रकारची विधानं करून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये”, असं मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
© IE Online Media Services (P) Ltd