राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “तुमचा दाभोळकर होणार,” अशी धमकी ट्विटरवरून देण्यात आली आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत याबाबत तक्रार दाखल केली. आता त्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या प्रकरणावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून ते विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांपर्यंत अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीदेखील भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवार आणि संजय राऊत यांना अशा प्रकारची धमकी येणं ही खूप गंभीर बाब आहे. शासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. सत्ता येते आणि जाते, याच्यात सामान्य माणूस आणि कुठलाही नेता असुरक्षित होऊ नये याची दक्षता शासनाने घ्यायला हवी. राज्य सरकार ही दक्षता घेईल अशी आशा आम्ही बाळगतो. या नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, पवार आणि राऊत या दोन्ही नेत्यांना पोलिसांनी सुरक्षा दिली पाहिजे. राजकीय नेते काय सांगतात, काय सांगत नाहीत यापेक्षा पोलीस खातं हे संरक्षणासाठी आहे. पोलीस खातं या दोन्ही नेत्यांना पूर्णपणे संरक्षण देईल अशी अपेक्षा बाळगतो.

हे ही वाचा >> शरद पवार, संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

धमकी प्रकरणावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केल्यावर ते म्हणाले, “ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे. तसेच त्यांना यासंबंधी तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar reaction on sharad pawar sanjay raut life threat asc