राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए ) आणि अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) देशातील वेगवेगळ्या राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI)विरोधात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एकूण १५ राज्यांमध्ये कारवाई केल्यानंतर पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे. तसेच भारतविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा – “…तर तो भाजपाचा निर्णय असेल,” एकनाथ खडसे-अमित शाह यांच्या आशिष शेलारांचे मोठे विधान
काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी?
“पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर कारवाई करायला केंद्र सरकारला इतका उशीर का लागला? या कारवाईवरून पाकिस्तानचे नारे जर कोणी लावत असेल, तर सर्वांना तत्काळ अटक करायला हवी. पाकिस्तान रोज आपल्याविरोधात बोलतो. तरीही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावाले पाकिस्तानचे नारे लगावत असतील, तर यांच्यावर कारवाई करण्यापासून गृहमंत्र्यांना कोण थांबवते आहे. शिवसेना नेहमीच अशा तत्वांच्या विरोधात राहिली आहे”, अशी प्रतिक्रिया प्रियंका चतुर्देवी यांनी दिली.
हेही वाचा – नरेंद्र मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवण्याचा होता PFIचा कट? ईडीने केला मोठा दावा
पंतप्रधान मोदींना लगावला टोला
“PFI वाले देशविरोधी कारवाई करत असताना त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मात्र, जे सरकार पाकिस्ताना आमंत्रण नसतानाही जातात, असा सरकारकडून दुसरी काय अपेक्षा करणार”, अशी टीकाही त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली.
देशभरात NIA ची कारवाई
दरम्यान, दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशभरातील १५ राज्यांत छापे टाकून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित सुमारे १०६ जणांना अटक केली आहे. महाराष्ट्रातही दहशतवाद विरोधी पथकाने राष्ट्रीय तपास यंत्रणेसह संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत २०हून अधिक जणांवर कारवाई केली आहे.