पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) देशभरातील अनेक राज्यांमध्ये कारवाई केली आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी नियोजित आंदोलनाच्याआधीच ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घोषणाबाजीचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही या वादात उडी घेतली आहे. 

पुण्यातील मुस्लीम समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआयविरोधात एनआयएने केलेल्या कारवाईविरोधातील आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन सुरु होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलीस काही कार्यकर्त्यांना गाडीमध्ये बसवून घेऊन जात असतानाच रस्त्यावर जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या नावाने घोषणाबाजी केली. आंदोलकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात ‘आरएसएस मुर्दाबाद’ अशीही घोषणाबाजी केली.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार या घोषणाबाजी प्रकरणात पुणे पोलिसांनी रियाज सय्यद आणि ६० ते ७० पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा झाल्याचा उल्लेख यामध्ये पोलिसांनी केला आहे.

या सर्व प्रकरणावर भाष्य करताना अतुल भातखळकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग केलं आहे. तसेच त्यांनी ठाकरे, सुळे आणि पवार या नावांचाही उल्लेखही केला आहे. ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या बातमीची लिंक शेअर करत भातखळकर यांनी, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह पीएफआयची विषवल्ली ठेचत आहेत. पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी झाली (यावर) पवार, सुळे, ठाकरे मूग गिळून बसलेत,” असं म्हटलं आहे.

भातखळकर यांच्या या ट्वीटवर अनेक शिवसैनिकांनी केंद्रात, राज्यात आणि पुण्यामध्ये भाजपाचीच सत्ता असल्याची आठवण रिप्लायमध्ये करुन दिली आहे. अनेकांनी भातखळकर यांना सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला हवा असं म्हणत दरवेळेस तुम्ही ठाकरे, पवार यांच्यावरच टीका करता असंही म्हटलं आहे. “फडणवीस झोपा काढतात का?”, असा प्रश्न एकाने विचारला आहे. तर दुसऱ्याने “पुण्यात सत्ता कोणाची आहे?” असा प्रश्न भातखळकरांना विचारा आहे. नुसत्या ठाकरेंच्या नावाने बोबा मारायच्या असा टोला भूपेंद्र मोरे यांना शिवसेना समर्थकाने ट्वीटला रिप्लाय देताना लगावला आहे. “केंद्रात, राज्यात नामर्द सरकार असल्याने या घटना घडत आहेत,” अशी टीका अन्य एका शिवसेना समर्थकाने रिप्लायमध्ये केली आहे. “बेकायदेशीर सरकार आहे तर पाकिस्तान जिंदाबाद काय तालिबानी जिंदाबाद बोलेलं तरी काही नवल वाटायला नको,” असा रिप्लाय सुदेश नावाच्या सेना समर्थकाने दिला आहे.

या प्रकरणामध्ये पुढील तपास सुरु असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. मात्र आता या प्रकरणावरुन राजकारण तापण्याची चिन्हं दिसत आहेत.