सातारा : महाबळेश्वर अन् वाहतूककोंडी हे जणू समीकरणच बनले असून, दिवाळी हंगामाआधीच शहरांतर्गत आणि वाई-महाबळेश्वर रस्त्यावर दांडेघर टोल नाका, मॅप्रो गार्डन महाबळेश्वर वेण्णा लेक प्रवासी कर नाक्यासह अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. पोलीस प्रशासनासह पालिका प्रशासनाच्या वतीने समन्वय राखून वाहतूक व्यवस्थेवर सकारात्मक तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राचे नंदनवन असलेले महाबळेश्वर पर्यटनस्थळी हंगामामध्ये वारंवार होणारी वाहतूककोंडी डोकेदुखी ठरत असते. अगदी वाईवरून पाचगणीच्या दांडेघर टोल नाक्यावर होणाऱ्या वसुलीमुळे नाक्यापासून वाई घाटापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. महाबळेश्वरहून वाईकडे जाणारे व वाईकडून महाबळेश्वरकडे स्वतःच्या वाहनाने अथवा एसटीच्या माध्यमातून येणाऱ्या नागरिकांना तर याचा मोठा फटका सहन करावा लागतो. पाचगणी सोडून वर महाबळेश्वरकडे येताना मॅप्रोनजीक होणारी वाहतूककोंडी हा प्रत्येक हंगामातील चर्चेचा विषय असतोच. त्यानंतर प्रामुख्याने महाबळेश्वर शहराचे प्रवेशद्वार असलेले वेण्णा लेक येथील प्रदूषण व प्रवासी कर नाका, वेण्णा लेक वाहनतळाकडे जा-ये करणारा रस्ता, तसेच वेण्णा लेक- महाबळेश्वर मुख्य रस्ता या ठिकाणी नियोजनाअभावी पर्यटकांचा दोन ते तीन तासांचा वेळ वाया जातो.

हेही वाचा…जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत

सध्या शहरांतर्गत अनेक गल्ल्या आहेत. यावर मोठे अतिक्रमण आहे. बाजारपेठेत सायंकाळी दाखल होणाऱ्या पर्यटकांना आपली वाहने लावण्यासाठी जागाच मिळत नाही. अनेक वेळा हॉटेल व्यावसायिक व पर्यटक असे भांडणाचे प्रसंगदेखील उद्भवत असतात. अशा वेळी हंगामापूर्वीच पोलीस प्रशासन व पालिका प्रशासकाने समन्वय राखून काम करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. महाबळेश्वर पोलीस प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बळ, वॉर्डनची मदत घेऊन वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problem of traffic congestion in mahabaleshwar created difficulties at many places sud 02