यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जाहीर झाला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी बुधवारी ही घोषणा केली. १ लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राजर्षी शाहू जयंतीदिनी म्हणजे मंगळवार (२६ जून) सायंकाळी ६ वाजता शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात येणार आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने दरवर्षी शाहू जयंतीनिमित्त समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

यंदाचा हा पुरस्कार अण्णा हजारे यांना त्यांच्या सामाजीक क्षेत्रातील अमुल्य कामगिरीबद्दल देण्यात येत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतीशील वारसा चालू ठेवणाऱ्या एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आणि त्यांनी समाज प्रबोधनाच्या वाटचालीमध्ये दीर्घकाळ दिलेल्या मौलिक योगदानाचा सन्मान म्हणूनही त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला असल्याचे देसाई यांनी सांगितले.

सन १९८४ पासून आत्तापर्यंत भाई माधवराव बागल, व्ही. शांताराम, डॉ. बाबा आढाव, तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी, गुरु हनुमान, नानासाहेब गोरे, चंद्रकांत मांढरे, कुसुमाग्रज, मायावती, न्या. पी. बी. सावंत, रॅंग्लर नारळीकर, आशा भोसले, राजेंद्रसिंह, प्रा. एन. डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, भाई वैद्य, शरद पवार, पुष्पा भावे या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajarshi shahu award to senior social worker anna hazare aau