Sanjay Raut मला हलक्यात घेऊ नका ज्यांनी मला हलक्यात घेतलं त्यांचा टांगा पलटी करुन आलो आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यांना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही दाढीला हलक्यातच घेतो असं संजय राऊत म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यातून नवा इतिहास घडेल याची खात्री-राऊत

ठाण्यातून नवा इतिहास घडेल वर्तुळ पूर्ण होऊ द्या. हे दिवसही जातील आणि पुन्हा एकदा ठाण्याच्या आपल्या शिवसेनेच्या विजयानेच होईल. इतिहास वर्तुळ पूर्ण करेल आणि पुन्हा इतिहास लिहिला जातो तो नवा इतिहास ठाण्यातूनच लिहिला जातो हे कुणीही विसरु नये. मगाशी कुणीतरी म्हणालं की याला पकडून आणतात, त्याला पकडून आणतात एक दिवस एकनाथ शिंदेंना लोक पकडून आणतील. याला घेता का तुमच्या पक्षात विचारतील. जे कुणी गेले आहेत ना ते लाभार्थी आणि डरपोक लोक आहेत. घाबरुन पळून गेलेले लोक आहे. यांच्याकडे विचार, स्वाभिमान, अभिमान, नीतीमत्ता हे सगळं औषधाला जरी असतं तर बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाशी त्यांनी इतकी बेइमानी केली नसती असं संजय राऊत म्हणाले.

आम्ही तुम्हाला हलक्यातच घेतो हे विसरु नका-संजय राऊत

शिवसेना फोडणं हे अमित शाह आणि नरेंद्र मोदींचं स्वप्न होतं. त्यामुळे डरपोक आणि कमजोर कडी हाताशी धरली आणि आपला पक्ष फोडला. राजकारणात आमचेही केस पांढरे झाले, आम्ही आता कलर लावून फिरतो. तु्म्ही (एकनाथ शिंदे) दाढीला कलर लावता आम्ही डोक्याला लावतो. दाढीला हलक्यात घेऊ नका असं ते म्हणतात आम्ही तुम्हाला हलक्यातच घेतो. कारण आम्हाला तुम्हाला वजनदार समजण्याचं कारण नाही. तुमचं सगळं आम्ही डोळ्यांनी पाहिलं आहे. पण शिवसैनिकांनो आता ही लढाई आहे. महापालिका निवडणुका येतील. महापालिकेपासूनच आम्ही पुन्हा आमच्या विजयाला सुरुवात करु. असं म्हणत राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

मोगलांना छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येनंतर आनंद झाला होता पण तो टिकला नाही हा इतिहास आहे-राऊत

लुटलेल्या पैशांची मस्ती आम्हाला दाखवू नका. आम्ही लुटायला सुरुवात केली तर आधी तुमच्या कंबरेवरचे कपडे लुटून घेऊ. तिथून आमची सुरुवात होईल तुमची अब्रू तर गेलेली आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवराय यांचं नाव सांगतो, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची ओळख स्वाभिमानी अशी देशात निर्माण करुन दिली. आपण मात्र माती खाल्लीत. मी आज इतकंच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर आणि छत्रपती संभाजी राजेंच्या निर्घृण हत्येनंतर मोगल आणि औरंगजेब हे आनंदाने बेहोश होऊन नाचू लागले होते. त्यांना वाटलं होतं महाराष्ट्राला राजाच राहिला नाही, महाराष्ट्र आमच्या हातात आला. पण तसं झालं नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही महाराष्ट्र पुढची २५ वर्षे लढत राहिला आणि झुंजत राहिला. शेवटी औरंगजेबाचं थडगं महाराष्ट्रातच बांधलं हा इतिहास आहे. जे आमच्यावर चाल करुन आलेत त्यांनी हा इतिहास समजून घेतला पाहिजे. हा गद्दारांचा इतिहास नाही. एकनाथ शिंदे कालपर्यंत आपल्या सगळ्यांचेच सहकारी होते. त्यांच्या सुख दुःखात आम्ही त्यांच्या बरोबर होतो. आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुला मोदी आणि शाह हातात बेड्या घालून घेऊन जाणार नाहीत. पण शेवटी शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं असल्यावर माणूस काय करणार? असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut answer to eknath shinde what did he say about him politics over shivsena split scj