मागील महिन्यात ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. तसेच, राज्यातील सत्तासंघर्षावरील निकालही सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत यांना शिवसेना पक्षाच्या संसदीय गटनेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी खासदार गजानन कीर्तिकर यांना संधी देण्यात आली आहे. गजानन कीर्तिकर हे सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल झाले होते. यावर आता संजय राऊत यांनी भाष्य करत निष्ठा राखण्यासाठी पद गमवायला तयार आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : “एकीकडे पत्रकार परिषद अन् दुसरीकडे बायकोला कुत्रा चावला, मग…”; राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही जर खोके घेत, गुडघे टेकले असते, तर त्या पदावर राहिले असतो. आम्हालाही सांगण्यात आलं, कशाला राहताय, काय राहिलंय तिकडे, आमच्याकडे या… त्यावर मी म्हटलं थुंकतो तुमच्या ऑफरवर… बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी बेईमानी करणार नाही. अशी अनेक पद ओवाळून टाकू. आम्ही स्वाभिमानी आणि निष्ठावंत आहोत.”

हेही वाचा : “…म्हणून वेगळ्या निकालाची अपेक्षा नव्हती,” राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रकरणावर संजय राऊतांनी मांडली भूमिका

“माझ्या पक्षाने भरपूर दिलं आहे. जर काही जात असेल, तर निष्ठा राखण्याासठी आम्ही गमवायला तयार आहोत. लाचारी पक्तरणारा नाही. बाळासाहेब ठाकरेंनी केलेले संस्कार निष्ठेचे आणि इमानदारीचे आहेत. पदासाठी, सत्तेसाठी गुडघे टेकण्याचे नाहीत. पद आज गेलीत, उद्या परत येतील. तेवढी हिंमत आमच्या पक्षात आणि नेतृत्वात आहे,” असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut first reaction after remove loksabha leader appointed gajanan kirtikar ssa