राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडी सरकार मध्ये एकत्रित असले तरी रायगड जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात आपापसात मतभेद सुरु आहेत. रायगडच्या नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने हा वाद समोर  आला आहे. माणगाव नगर पंचायतीत झालेला पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला असून त्याची दखल घेत खासदार सुनील तटकरे यांनी घेऊन भविष्यात जिल्‍हयातील राजकारणात शिवसेने सोबत दोन हात करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे आता रायगड जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी माणगाव तालुक्‍यातील निजामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसने मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्‍यात खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेच्या रायगड जिल्‍हयातील कार्यपद्धतीवर सडकून टीका केली.

सत्तेसाठी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने भाजपाची मद्त घेतली आणि शिवसेनेने लाजीरवानी गोष्ट केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अश्लाघ्य भाषेत टिका करणाऱ्या भाजपाशी संगनमत केले, अशा शिवसेनेने आम्हाला निष्ठा शिकवू नये,अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली. शिवसेनेचे प्रसाद गुरव, मिलिंद फोंडके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्याने पक्षसंघटनेला बळकटी मिळणार असल्याचे तटकरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस निजामपूर विभाग व सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान च्या वतीने  रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा, निजामपुर विभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन,  तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश व माणगाव नगरपंचायत मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडले.

“राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याचे माहिती असतानाही त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करणाऱ्या भाजपाला राज्यातील महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षांनी आपापल्या परीने उत्तर दिले. मात्र माणगाव मधील एक नगर पंचायत मिळावी म्हणून शिवसेनेने याच भाजपाची मदत घेतली. राजकारणात इतकी लाजिरवाणी परिस्थिती मी पाहिली नाही. पक्ष प्रमुखांवर टीका आणि दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध करणारी भाजपा मतांसाठी शिवसेनेला चालते, हे लोक पक्षाजवळ काय निष्ठा ठेवणार,” अशा शब्दांत तटकरे यांनी शिवसेनेला फटकारले. माणगाव नगर पंचायतीत झालेल्या पराभवाचा वचपा आता राष्ट्रवादी काढल्याशिवाय राहणार नाही यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. 

सुनील तटकरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आता जिल्‍हयातील सेना राष्ट्रवादी मधील वाद विकोपाला गेला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे याबाबत आता शिवसेना काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena should not teach us loyalty criticism mp sunil tatkare abn
First published on: 27-01-2022 at 16:40 IST