सेनेकडून दुसरा उमेदवार रिंगणात ; राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस; अपक्ष व छोटय़ा पक्षांच्या आमदारांना महत्त्व

भाजपनेही तिसरा उमेदवार रिंगणात उतरविल्यास अपक्ष आणि छोटय़ा पक्षांच्या आमदारांचा ‘भाव’ वाढणार आहे.

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. सहाव्या जागेसाठी शिवसेनेने महाविकास आघाडीतील अतिरिक्त मतांच्या आधारे दुसरा उमेदवार उभा करण्याचे जाहीर केल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. भाजपनेही तिसरा उमेदवार रिंगणात उतरविल्यास अपक्ष आणि छोटय़ा पक्षांच्या आमदारांचा ‘भाव’ वाढणार आहे.

शिवसेना राज्यसभा निवडणुकीसाठी दुसरा उमेदवार उभा करणार आहे. त्यासाठी कशारितीने आखणी करायची याचा निर्णय आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून घेतील, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले. माजी खासदार संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. संभाजीराजे यांच्या उमेदवारीबद्दल आघाडीतील घटक पक्ष निर्णय घेतील, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केल्याने संभाजीराजे यांच्या नावावर सहमती होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती.

दोन वर्षांप्रू्वी राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराला अतिरिक्त मते दिली होती. या वेळी शिवसेना निश्चित करेल त्या उमेदवाराला राष्ट्रवादीची अतिरिक्त मते मिळतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याने महाविकास आघाडी रिंगणात उतरणार हे स्पष्ट झाले होते.

संभाजीराजे यांनी शिवसेनेत  प्रवेश केल्यास त्यांना उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेने दर्शविली होती. संभाजीराजे मात्र अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार महेश बालदी यांनी संभाजीराजे यांना पािठबा जाहीर केला आहे. शिवसेनेचे पहिले उमेदवार संजय राऊत असणार हे उघड आहे. आता शिवसेनेचा दुसरा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आहे.

भाजपचे तीन खासदार निवृत्त होत आहेत. भाजपकडे २२ मते अतिरिक्त आहेत.  भाजपही तीन उमेदवार उभे करणार आहे. भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविला किंवा संभाजीराजे यांना पािठबा दिला तरी निवडणूक चुरशीची होऊ शकते. भाजपला अतिरिक्त २० मतांची व्यवस्था करावी लागेल. राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान होत असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता कमी असते. अतिरिक्त मतांचे गणित-निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता असेल. शिवसेनेचे ५५ आमदार असून, शिवसेनेकडे १३ मते अतिरिक्त आहेत. राष्ट्रवादीचे ५३ आमदार असून, पक्षाकडे ११ मते अतिरिक्त आहेत. काँग्रेसकडे दोन अतिरिक्त मते आहेत. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडे २६ अतिरिक्त मते आहेत. आघाडीला चौथा उमेदवार निवडून आणण्याकरिता १६ मतांची आवश्यकता असेल. अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांच्या मदतीने महाविकास आघाडीचे गणित जमू शकते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena two candidates contest rajya sabha elections zws

Next Story
महिलांवर हात उगाराल तर तोडून टाकू!; सुप्रिया सुळे यांचा इशारा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी