सांगली : पावसाचा जोर ओसरताच कोयना, चांदोली धरणाच्या सांडव्यावरील दारे मंगळवारी बंद करण्यात आली असून, जलसंचयाकडे धरण व्यवस्थापनाने लक्ष केंद्रित केले आहे. पाणलोट क्षेत्रातील पाझर लक्षात घेऊन दोन्ही धरणांच्या विद्युतगृहातील विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे कृष्णा, वारणा नदीचे पाणी येत्या २४ तासांत पात्रात परतणार आहे. कोयना धरणात मंगळवारी सकाळी ८६.०४ टीएमसी (८२ टक्के), तर चांदोलीमध्ये २८.९० टीएमसी (८४ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्या २४ तासांत कोयनेवर ५३, तर चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये १८ मिलिमीटर पाऊस झाला असून, पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातील विसर्गही कमी करण्यात आला आहे. कोयनेच्या सांडव्यावरून वक्र दरवाजातून करण्यात येणारा विसर्ग मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून पूर्णपणे थांबविण्यात आला असून, केवळ पायथा विद्युतगृहातून होणारा दोन हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. चांदोली धरणाच्या सांडव्यावरील वक्र दरवाजातून होत असलेला विसर्ग आज सकाळी साडेदहानंतर थांबविण्यात आला असून, केवळ विद्युतगृहातून १ हजार ४७५ क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. हेही वाचा : Bachchu Kadu : “मुख्यमंत्र्यांचा गणपती करू”, या वक्तव्यावर बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निवडणुकीत…” यामुळे कृष्णा व वारणा नदीतील पाणी पातळी कमी होण्यास मदत होणार असून, पात्राबाहेर पडलेले पाणी येत्या २४ तासांत पात्रात परतणार आहे. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी मंगळवारी दुपारी दोन वाजता ३५ फूट ६ इंचांवर स्थिरावली असून, नदीपात्रातील कोयनेतून होत असलेल्या विसर्गाची ओहोटी सांगलीत पोहचण्यास किमान १२ तासांचा अवधी लागणार आहे. यामुळे उद्या दुपारपर्यंत कृष्णेचे पाणी पात्रात विसावण्याची चिन्हे आहेत. हेही वाचा : सिंधुदुर्ग: नारीशक्तीचा ‘सर्व्हर डाऊन’; लाडक्या बहिणींची उडाली झोप कर्नाटकातील अलमट्टी धरणात पाण्याची आवक ३ लाख २ हजार ६६० क्युसेक प्रति सेकंद असून, जलसंचयासाठी पाण्याचा विसर्ग दोन लाख क्युसेक करण्यात आला आहे. आज सकाळी धरणातील पाणीसाठा ८६.३७५ टीएमसी झाला असून, धरण ७० टक्के भरले आहे. जिल्ह्यात सरासरी २.४ मिमी पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.