डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने एकत्र येतात. यानिमित्ताने विशेष शासकीय कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते. आज (६ डिसेंबर) चैत्यभूमीवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी आणि अजित पवार, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह अनेक अधिकारी आणि नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि बंधुता ही जी भगवान गौतम बुद्धांनी सांगितेलली तत्वे आहेत, या तत्त्वांच्या आधारे संविधान तयार केलं. म्हणूनच जगामध्ये आपली आगळी वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. आंबेडकरांनी आपल्या जीवनात अर्थतज्ज्ञ, मजूर मंत्री, पाटबंधारे मंत्री म्हणून काम पाहिलं. त्यांचं प्रत्येक काम हे भारताच्या निर्मितीचं पहिलं पाऊल ठरलं आहे. म्हणूनच आपण त्यांना महामानव म्हणतो. तज्ज्ञांचे विचार जिथे संपतात तिथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सुरू व्हायचे. म्हणूनच आज देशाच्या वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.

हेही वाचा >> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मे २०२६ मध्ये पूर्ण होणार; आतापर्यंत एकूण ३५ टक्के काम पूर्ण

“मला या गोष्टीचं समाधान आहे की अनेक वर्ष इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं अशी मागणी चालली होती. यासाठी अनेक आंदोलने झाली. मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी, पंतप्रधान मोदींना विनंती केली की इंदू मिलची जागा आपल्याला मिळाली आहे. आता भव्य स्मारकाचं निर्माण तिथं होत आहे. आमचा प्रयत्न तरी असा आहे की पुढच्या महापरिनिर्वाण दिनाला आपण इथे येऊ तेव्हा त्या स्मारकालाही आपल्याला अभिवादन करता आलं पाहिजे या दृष्टीने पंतप्रधानांच्या नेतृत्त्वात वेगाने काम सुरू आहे”, असं म्हणत फडणवीसांनी स्मारकाबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हे काम वेगाने होत असल्याचं सांगितलं.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्याठिकाणी दीक्षा घेतली, त्या दीक्षा भूमीवर २०० कोटींची विकासाची कामे सुरू केली आहेत. पवित्र दीक्षा भूमी ही जागतिक दर्जाची वास्तू तयार झाली पाहिजे. कारण दीक्षा भूमी भारतासाठीच महत्त्वाची नसून जगभरातील बौद्ध अभ्यासक या दीक्षा भूमीवर येत असतात. त्याकरता काम सुरू केलं आहे. आज लंडनमधलं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचं घर महाराष्ट्र सरकारने विकत घेतलं. तिथेही आपण त्यांच्या अतिशय मौल्यवान वस्तू ठेवल्या आहेत”, अशीही माहिती फडणवीसांनी दिली.

हेही वाचा >> Dr. Ambedkar Marathi Quotes: महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरांचे 9 विचार मनी रुजवून, शेअर करून वाहा आदरांजली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाविषयी

राज्य सरकारने दादरमधील इंदू मिलमधील ४.८४ हेक्टर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१५ मध्ये या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र या भूमिपूजनानंतर स्मारकाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्यास २०१८ पर्यंत वाट पाहावी लागली. काही कारणांमुळे कंत्राटदारास कार्यादेश देण्यास विलंब झाला. परिणामी, स्मारकाचे काम सुरू होण्यासही विलंब झाला. या स्मारकाचे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. एमएमआरडीएने आता स्मारकाच्या कामाला वेग दिला. स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will dr babasaheb ambedkar memorial in indu mill complete important hints given by fadnavis sgk