शाहरुख खान आणि दीपिका पदूकोणचा ‘पठाण’ हा चित्रपट सुपरहीट ठरला. वेगवेगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले. हा चित्रपट यश चोप्रा यांच्या ‘यश राज फिल्म्स’ या बॅनरखाली बनला असून ‘यश राज’च्या गेल्या काही वर्षांतील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ज्या यश चोप्रा यांनी ‘यश राज फिल्म्स’ची सुरुवात केली त्यांच्यावर बेतलेला एक माहितीपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘फादर ऑफ रोमान्स’ अशी ओळख असणाऱ्या यश चोप्रा यांच्यावर बेतलेल्या ‘द रोमॅंटिक्स’ या डॉक्युमेंट्री सीरिजमध्ये यश चोप्रा यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायला मिळणार आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांचं नाव कसं मोठं झालं? शिवाय त्यांना फादर ऑफ रोमान्स का म्हंटलं जातं यामागील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार. बऱ्याच कलाकारांनी, दिग्दर्शकांनी निर्मात्यांनी या सीरिजच्या मुलाखतींमध्ये सहभागी होऊन यश चोप्रा यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

कॅमेरा आणि लाईमलाइटपासून कायम दूर राहणारा यश चोप्रा यांचा मोठा मुलगा आणि सध्याचा बॉलिवूडमधील एक यशस्वी निर्माता आदित्य चोप्रा यानेसुद्धा बऱ्याच वर्षांनी कॅमेरासमोर येऊन आपल्या प्रवासावर भाष्य केलं. ‘यश राज फिल्म्स’ला रोमान्समधून बाहेर काढण्यात आदित्य चोप्राचा खूप मोठा हात आहे. एक निर्मिती संस्था म्हणून त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांची निर्मिती केली, बरेच प्रयोगही केले. त्यापैकी ‘धूम’ हा असाच एक यशस्वी चित्रपट. या सीरिजमध्ये आदित्य चोप्राने याच ‘धूम’च्या निर्मितीमागच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत.

आणखी वाचा : ‘कांतारा’ फेम रिषभ शेट्टीची सर्वत्र चर्चा; दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळणार विशेष पुरस्कार

धूमच्या वेळेस आदित्य चोप्रा याला तेव्हाच्या तरुणाईला आपलंसं वाटेल असं कथानक समोर आणायचं होतं. ‘धूम’ या चित्रपटाच्या माध्यमातून आदित्यने एक प्रयोग केला जो चांगलाच यशस्वी झाला. याविषयी बोलताना आदित्य चोप्रा म्हणतो, “या चित्रपटासाठी मी कोणत्याही स्टारला घेतलं नाही. तिघेही अभिनेते हे तेव्हा स्ट्रगलच करत होते. शिवाय ‘धूम’साठी आमचं बजेट हे फक्त १ कोटीचं होतं. त्यातच आम्हाला पूर्ण चित्रपट करायचा होता. तेव्हा मी अभिनेत्यांऐवजी चित्रपटात वापरण्यात आलेल्या बाइक्सवर जास्त खर्च केला. स्टार्सचं बजेट मी तिथे वापरलं.”

२००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘धूम’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तरुणाईमध्ये केस वाढवण्याची आणि स्पोर्ट्स बाइकची क्रेझ वाढली. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिषेक बच्चनला त्याचा पहिला हीट चित्रपट मिळाला. शिवाय यातील गाणी, डायलॉग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. हा चित्रपट एवढा यशस्वी झाला की त्याचे पुढे २ भागही काढण्यात आले. आता ‘धूम ४’च्या घोषणेची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya chopra talks about first dhoom movie its making and its budget avn