बॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याच्या आगामी ‘भोला’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अजय देवगणसह बॉलिवूड अभिनेत्री तब्बू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस ‘भोला’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘भोला’च्या प्रमोशनसाठी अजय देवगण व तब्बूने ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी लावली.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांना दिलखुलास व गमतीशीर पद्धतीने उत्तरं देत अजय देवगण व तब्बूने कार्यक्रमात रंगत आणली. ‘द कपिल शर्मा’ शोमधील अजय देवगण व तब्बूचे काही प्रोमो व्हिडीओ सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये कपिलने विनोदी शैलीत प्रश्न विचारुन अजय देवगण व तब्बूला बोलतं केल्याचं पाहायला मिळत आहे.
‘द कपिल शर्मा’ शोमध्ये कपिलने अजय देवगणला ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देत अजय देवगण म्हणाला, “नाटू नाटू गाण्याला माझ्यामुळे ऑस्कर मिळाला आहे”. अजयच्या या उत्तराने सगळेच आश्चर्यचकित झाले. त्यानंतर अजय देवगण पुढे हसत म्हणाला, “जर मी नाटू नाटूमध्ये डान्स केला असता तर गाण्याला पुरस्कार मिळाला नसता”. अजय देवगणच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला.
दरम्यान, ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळालेला ‘आरआरआर’ चित्रपट २०२२च्या मार्च महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात डंका वाजवला होता. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ चित्रपटात ज्युनिअर एनटीआर व राम चरण मुख्य भूमिकेत होते. तर अजय देवगणने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.