Kantara 2 Movie Actor Kalabhavan Niju Death : दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटाला मिळालेले यश पाहुन ऋषभ शेट्टीने ‘कांतारा २’ची घोषणा केली होती. तेव्हापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तेव्हापासून हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झाल्यापासून या चित्रपटाच्या सेटवर विविध घटना घडत आहेत.
कलाभवन निजू यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अशातच आता ‘कांतारा २’ बद्दल एक बातमी समोर येत आहे, चित्रीकरणादरम्यान एका अभिनेत्याचं निधन झालं आहे. गुरुवार, १२ जून रोजी बंगळुरूमध्ये ‘कांतारा चॅप्टर १’चे शूटिंग सुरू असताना अभिनेते कलाभवन निजू यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. Onmanorama च्या वृत्तानुसार, कलाभवन निजू यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांना वाचवता आले नाही.
अभिनेते कलाभवन निजू यांच्याबद्दल थोडक्यात
कलाभवन निजू हे गेल्या २५ वर्षांपासून मिमिक्री आर्टिस्ट म्हणून काम करत आहेत. त्यांनी दोन दशकांपूर्वी केरळच्या मिमिक्री कलाकार संघाकडून आयोजित शोमधून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. गेल्या काही वर्षांत त्यांनी ‘उन्नी मुकुंदन’, ‘सैजू कुरुप’ आणि देवा नंदा यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमधून सहाय्यक कलाकार म्हणून ओळख मिळवली. नुकत्याच आलेल्या ‘मार्को’ या चित्रपटातही ते दिसले होते.
‘कांतारा २’ संबंधित गेल्या काही महिन्यांतील घटना
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या ‘कांतारा २’ चित्रपटाच्या टीमसाठी ही घटना म्हणजे आणखी एक धक्का आहे. यापूर्वी कोल्लूरमध्ये काही कलाकारांना घेऊन जाणारी बस उलटली होती. नंतर वारा आणि पावसामुळे चित्रपटाचा भव्य सेटचंही नुकसान झालं होतं. तसंच चित्रीकरणादरम्यान नैसर्गिक अधिवासाला त्रास दिल्याच्या आरोपाखाली वन विभागाकडूनही टीमची चौकशी करण्यात आली होती.
गेल्या महिन्यात ज्युनिअर आर्टिस्टचा सेटवर झालेला मृत्यू
गेल्या महिन्यात एमएफ कपिल नावाच्या ज्युनिअर आर्टिस्टचं सौपर्णीका नदीत बुडून मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. हा अपघात ‘कांतारा २’ च्या सेटवर झाला असल्याचं वृत्त सुरुवातीला आलं होतं. मात्र त्यानंतर निर्मात्यांनी हे वृत्त फेटाळत त्या ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू सेटवर झाला नसल्याचं एका निवेदनातून स्पष्ट केलं. त्यानंतर आता सेटवर कलाभवन निजू या कलाकाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.