‘हायवे’ हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. त्यामुळे ‘हायवे’वरच्या प्रवासाची कथा सांगणारा चित्रपट करायचा निर्णय झाला तेव्हा खूप वेगवेगळ्या गोष्टी समोर येत गेल्या. पण, फिरणे किंवा स्वच्छंदपणे भटकणे हे रक्तातच असल्याने असेल पण, ‘हायवे’ चित्रपटात माझ्याच स्वानुभवांची गुंफण असेल, असे सांगणाऱ्या दिग्दर्शक इम्तियाज अलीने या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवासही ‘रोजनिशी’ टिपून ठेवावी तसा कॅमेऱ्याने टिपून घेतला आहे. ‘हायवे डायरीज’ हा त्याच्या चित्रपटाचा प्रवास घडवणारा बॉलिवूडचा वेगळा प्रयत्न ठरणार आहे.
चित्रपट निर्मितीची प्रक्रिया हा सगळ्यांसाठीच मोठा औत्सुक्याचा विषय असतो. कॅमेऱ्यामागे आणि समोर असणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञांसाठी ते स्मरणरंजन असते तर सामान्य माणसासाठी पडद्यामागचे गुपित. पण, ‘हायवे’ चित्रपटाची संकल्पनाच वेगळी असल्याने त्याच्या निर्मितीचा प्रवास हाही एक वेगळा अनुभव ठरेल, असे वाटल्याने इम्तियाज अलीने या प्रवासाचे वेगळे चित्रिकरण केले. ते छोटय़ा छोटय़ा चित्रफितींमधून ‘हायवे डायरीज’ नावाने झळकत आहे. ‘रॉकस्टार’च्या यशानंतर भन्नाट काहीतरी करावे, ही इम्तियाजची इच्छा होती. रणदीप हुडा आणि अलिया भट्ट हे तुलनेने नवे चेहरे घेऊन त्याने ‘हायवे’ची कथा रंगवली. चित्रपटातली वीराची (अलिया) कथा उत्तरेकडच्या सात राज्यांमधून फिरते. त्यामुळे, या सात राज्यांमधील संस्कृती, लोक, लोकसंगीत अशा सगळ्या गोष्टींची अनोखी गुंफण या चित्रपटात आहे. आणि त्याची एक झलक इम्तियाजच्या ‘हायवे डायरीज’मधून दिसते.
‘हायवे डायरीज’चा सातवा आणि शेवटचा भाग हा नुकताच काश्मीरमध्ये चित्रित करण्यात आला. काश्मीरमधील दऱ्याखोऱ्यांमध्ये तिथल्या ‘गुजारा’ समाजाचे लोक, त्यांचे लोक संगीत गाणारी गायिका बेगम जानबरोबर गाणी ऐकत सुरू असलेले चित्रिकरण हा सगळा भाग ‘सॉंग्ज ऑफ व्हॅली’ या शेवटच्या व्हिडिओत पाहायला मिळतो. इम्तियाजच्या म्हणण्यानुसार हा भाग चित्रपटात वीराच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा केवळ वीराचा नाही तर त्या काळाचा, त्या स्थळाचा असा प्रवास आहे. तो त्या पद्धतीने यावा म्हणून बेगम जानचे गाणेही चित्रपटात वापरण्यात आले आहे. इम्तियाजची ‘हायवे डायरीज’ चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारी ठरली आहे. याआधी ‘लगान’ चित्रपट यशस्वी झाल्यानंतर आमिर खानने त्याचे मेकिंग दाखवणारा ‘चले चलो’ हा लघुपट केला होता. मात्र, इम्तियाजने चित्रपट तयार व्हायच्या आधीच ‘हायवे डायरीज’ करून वेगळा पायंडा पाडला आहे. आता बॉलिवूडमधला हा नवा ट्रेंड ठरल्यास नवल वाटायला नको.
संग्रहित लेख, दिनांक 13th Dec 2013 रोजी प्रकाशित
पडद्यावर येण्याआधीच चित्रपटाचा जन्मपट
‘हायवे’ हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. त्यामुळे ‘हायवे’वरच्या प्रवासाची कथा सांगणारा चित्रपट करायचा निर्णय झाला तेव्हा खूप वेगवेगळ्या गोष्टी समोर येत गेल्या

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-12-2013 at 06:18 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Highway diaries by imtiaz ali