त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये उमटताना दिसत आहेत. अमरावती, नांदेड, औरंगाबादमध्ये हिंसक घटना घडल्याचे दिसून येत आहे. यात अमरातवीतमध्ये घडलेल्या हिंसाचाराने वातावरण अधिकच चिघळले आहे. या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांनी पुढाकार घेत अमरावतीतील नागरिकांनी शांतता राखावी, यासाठी आवाहन केले आहे. अमरावतीचे सुपुत्र आणि अभिनेते भारत गणेशपुरे यांनी “शांत डोक्याने विचार करा,” असे आवाहन केले आहे. तर प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी “कोणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल तर होऊ देऊ नका,” असे आवाहन अमरावतीकरांना केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत गणेशपुरे काय म्हणाले?

“गेल्या काही दिवसांपासून जी बातमी येऊ नये असं वाटत होतं, अखेर ती खबर आली. अमरावतीत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आता कुठे लोकांनी दुकाने सुरु केली आहे. आता लोकांचे धंदे सुरु झालेत. त्यातच आता ही तोडफोड, बंद करणे हे असे करु नका. जे काही घडलं असले तरी तुम्ही संतनगरीची माणसं आहात, ते सर्व माफ करुन शांत व्हा,” असे आवाहन भारत गणेशपुरे यांनी केले आहे. याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी हे आवाहन केले आहे.

“अमरावतीकरांनो शांत डोक्याने विचार करा. नंतर हे सर्व आपल्यालाच भोगावं लागणार आहे. त्यामुळे कोणाचेही नुकसान करु नका. थोडेसे समुजतदार पद्धतीने घ्या. मी पुन्हा हात जोडून विनंती करतो अमरावतीला परत एकदा मोकळा श्वास घेऊ द्या,” असेही भारत गणेशपुरे म्हणाले.

गायिका वैशाली माडे यांची प्रतिक्रिया

“अमरावतीत जी परिस्थिती उद्भवली आहे ती पाहून दु:ख होत आहे. ज्यांचे नुकसान होतंय ती सुद्धा आपलीच माणसं आहेत आणि जे नुकसान करतात ती देखील आपलीच माणसं आहेत. स्वत:वर नियंत्रण ठेवा. कोणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल तर होऊ देऊ नका. शांतता राखा. कोविडचे संकट अजूनही संपलेले नाही. जर अशा पद्धतीने घटना घडत असतील तर तिसरी लाट, चौथी लाट याचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. आता कुठे आपण त्यातून बाहेर पडतोय. स्वत:ला, नातेवाईकांना, कुटुंबाला जपा. कोणत्याही हिंसाचाराला बळी पडू नका. आपलं शहर आहे, त्यात शांतता राखण्याचे काम पहिलं आपलं आहे. सर्व प्रिय अमरावतीकरांना, शांतता राखा, वाढलेली हिंसा संपवण्याचा प्रयत्न करा,” असे आवाहन गायिका वैशाली माडे यांनी केले.

लोकांची डोकी भडकावून जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करणाऱ्यांना सोडणार नाही – शंभूराज देसाई

भाजपा कार्यकर्त्यांडून शहरात मोठ्या प्रमाणात तोडफोड

दरम्यान, त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) मुस्लीम समाजाने काढलेल्या मोर्चा दरम्यान हिंसाचार झाला. त्याचा निषेध म्हणून आज (१३ नोव्हेंबर) भाजपच्या वतीने अमरावती बंद पुकारण्यात आला. या बंदला हिंसक वळण लागले आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नमुना परिसर तसेच अंबापेठ परिसरात अनेक दुकाने फोडण्यात आली. एका हॉस्पिटलवर देखील दगडफेक करण्यात आली आहे.

यानंतर अमरावतीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले असून, जमाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. तसेच, नागरिकांना देखील आवाहन केले आहे. तसेच “परिस्थिती चिघळेल अशी प्रक्षोभक वक्तव्ये किंवा सोशल मिडीया पोस्ट कोणीही करू नयेत. अमरावती हे औद्योगिक शहर आहे, या जिल्हाला मोठा सांस्कृतिक-सामाजिक वारसा आहे. अमरावतीच्या लौकिकाला गालबोट लागणार नाही याची काळजी आपण सर्व जण घेऊया.” असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi artists to appeal to the citizens of amravati to maintain peace nrp