Ashok Saraf : महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. २७ मे रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कला, सामाजिक कार्य आणि संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ६८ प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

पद्मश्री पुरस्काराने सन्मान झाल्यावर अशोक सराफ यांनी “पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे.” असं म्हणत आपल्या भावना केल्या. या सोहळ्याला त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ देखील उपस्थित होत्या. पुरस्कार सोहळा पार पडल्यावर हे दोघंही परतीच्या प्रवासाला निघाले यादरम्यान विमानात एक सुंदर क्षण अशोक सराफ यांना अनुभवण्यास मिळाला.

निवेदिता सराफ यांची भाची अदिती परांजपे ही पायलट आहे. गेल्यावर्षी निवेदिता यांनी अदितीचा विमानात मराठीत उद्घोषणा करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. अदितीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता अशोक व निवेदिता सराफ दिल्ली ते मुंबई प्रवास करत असताना त्यांची फ्लाइट कॅप्टन अदिती होती. यावेळी अदितीने विमानात खास उद्घोषणा करत अशोक सराफ यांचं अभिनंदन केलं आहे.

अदिती व्हिडीओ शेअर करत म्हणते, “नमस्कार! मी तुमची फ्लाइट कॅप्टन अदिती परांजपे. दिल्ली ते मुंबई या विमानप्रवासात तुम्हा सर्वांचं खूप-खूप स्वागत आहे. हा आजचा विमानप्रवास माझ्यासाठी खरंच खूप खास आहे कारण, माझे काका अशोक सराफ या विमानातून माझ्याबरोबर प्रवास करत आहेत. त्यांचा नुकताच पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. मला खूप अभिमान वाटतोय की, आज त्यांच्यासह मी दिल्ली ते मुंबई हा प्रवास करणार आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की, प्लीज जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करा, त्यांचं स्वागत करा. ही फ्लाइट आणि आजचा हा प्रवास माझ्यासाठी खूपच स्पेशल आणि भावनिक आहे.”

अदितीने तिच्या इन्स्टाग्रामवर हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. ती म्हणते, “हा अतिशय खास आणि भावनिक क्षण होता…आयुष्यात एकदाच येणारं ‘उड्डाण’…अशोक काका तुमच्यासह फ्लाइट कॅप्टन म्हणून प्रवास करता आला याचा प्रचंड अभिमान वाटतोय. पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अदितीचा व्हिडीओ सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत असून, सुप्रिया पिळगांवकर, हेमंत ढोमे, क्षिती जोग, ऋतुजा बागवे, संकेत पाठक, सुपर्णा श्याम अशा अनेक मराठी कलाकारांनी अदितीच्या व्हिडीओवर कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे.